कोल्हापूर : लॉकडाऊनच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर गोंधळ असून सकाळी ७ ते ११ ही वेळ चुकीची आहे. त्याऐवजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अशी वेळ करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
राज्यात दोन महिने दुकाने बंद करूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरले असून अशा काळात सामान्य माणसाने जगायचे कसे? असा प्रश्न आहे. लॉकडाऊनबाबत मुळात राज्य शासनच गोंधळलेले आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला खरेदी करून त्याची विक्री करता येत नाही. खरेदी-विक्रीची वेळ कमी असल्याने साहजिकच गर्दी होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत करावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली.