राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) संपूर्ण कर्नाटकात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटविला जावा, अशी शिफारस केली आहे.
त्यामुळे कोरोनाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १४ जूननंतर म्हणजे लाॅकडाऊन समाप्त झाल्यानंतर राज्य सरकार छोटी-छोटी पावले उचलून सर्वसामान्य परिस्थितीकडे वाटचाल करण्यास सज्ज होणार आहे. टीएसीने लाॅकडाऊन शिथिलीकरण अर्थात अनलाॅकिंग प्रक्रियेसंदर्भात सरकारकडे सोमवारी (दि. ७) सादर केलेल्या शिफारशींमध्ये सर्व दुकाने, मॉल्स आणि हॉटेल्स सुरवातीला चार तास सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली आहे. तथापि प्रार्थनास्थळे, स्विमिंग पूल आणि इतर गोष्टी जूनअखेरपर्यंत खुल्या केल्या जाऊ नयेत, अशी शिफारस केली आहे.
मृतांचा आकडा आणि आढळून येणारे नवे रुग्ण लक्षात घेता कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन एकदम हटविला जाऊ नये, असे टीएसीने स्पष्ट केले आहे, असे सांगून या संदर्भात आपली गृहमंत्री बसवराज बोम्मई आणि आरोग्यमंत्री आर. सुधाकर यांच्याशी तपशीलवार चर्चा झाल्याचे मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.
लॉकडाऊन शिथिल केला जाईल. मात्र ही प्रक्रिया बहुधा चार किंवा पाच टप्प्यांत होईल. पहिला मुद्दा वेळेचा असेल. सध्या सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत लाॅकडाऊन शिथिल केला जात आहे.