कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे हैदराबादमध्ये यंत्रसामग्री अडकल्यामुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम पुन्हा ठप्प झाले आहे. जॅकवेलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांही पळ काढला आहे. येथील काम मेअखेर काम पूर्ण करणे कठीण झाले आहे.
काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम बिल दिले नसल्यामुळे थांबले होते. महापालिकेने पाच कोटींचे बिल दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला.
याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. यामध्ये काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले आहे. जॅकवेलमधील डि-वॉटरिंंगचे काम पूर्ण झाले असून, गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येणार होते. ठेकेदार कंपनी हैदराबादची आहे. येथील काम जलद गतीने होण्यासाठी हैदराबाद येथून अद्ययावत तंत्रज्ञानाचे यंत्र आणले जाणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे यंत्रसामग्री येऊ शकलेली नाही.
१०० कर्मचारी पळाले, येणारेही निम्म्यातून माघारीकोरोना विषाणूचा परिणाम पुढील आणखी किती दिवस राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे जॅकवेलवरील १०० कर्मचा-यांनी ठेकेदाराला न सांगताच मूळ गावी पळ काढला. तसेच जॅकवेलमधील स्टील बांधकामासाठी पश्चिम बंगाल, राजस्थान येथून विशेषतज्ज्ञ कर्मचारी येणार होते. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद झाल्याने निम्म्या वाटेतूनच त्यांना माघारी परतावे लागले.