सातारा : मारहाणीचा आरोप असलेल्या संशयिताने पोलिसांच्या ‘लॉकअप’मध्ये गजावर डोके आपटून घेतल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. हा प्रकार बुधवारी रात्री नऊ वाजता घडला.मंगेश बाळू नलवडे (वय २६, रा. इंदिरानगर, सातारा) असे डोके आपटून घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बारावकरनगर येथे बुधवारी दुपारी घरात घुसून महिलेसह तिघांना मारहाण केल्याच्या आरोपावरून शहर पोलिस ठाण्यात सुमारे १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. बारावकरनगरमधील इंद्रजित विजय पाटील याला मारहाण करण्यात आली होती. यामध्ये मंगेश नलवडे याचा समावेश होता. पोलिसांनी मंगशेला बुधवारी रात्री याप्रकरणी अटक केली. त्याला शहर पोलिस ठाण्याशेजारील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास त्याने लॉकअपमधील गजावर अचानक जोरदार डोके आपटले. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. हा प्रकार तेथे असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला पुन्हा लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, मंगेशने हा प्रकार का केला, याची पोलिस चौकशी करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही नसते तर..काही वर्षांपूर्वी बऱ्याच आरोपींनी लॉकअपमध्येच डोके आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अशा संशयितांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला होता. त्यामुळे विनाकारण पोलिसांवर बालंट येत होतं. अशा प्रकारचे वारंवार प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी काळानुसार बदल करून लॉकअपमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविली. त्यामुळे संशयितांनी कितीही आकांडतांडव केला तरी पोलिसांना आता काळजी नाही. बुधवारी घडलेला प्रकारावेळी सीसीटीव्ही नसता तर नेहमीप्रमाणेच पोलिसांवर आरोप झाले असते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिस ‘लॉकअप’मध्ये आपटले डोके
By admin | Published: April 28, 2016 9:38 PM