कोल्हापूर : एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार वर्षभरापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या कारमधून प्रवास करीत होता. पंचतारांकित हॉटेल्समधील सेमिनारमध्ये ग्रँड एन्ट्रीने त्याचे स्वागत केले जायचे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्याच्याकडून लपंडाव सुरू होता. हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि मुंबईमध्ये तो सतत जागा बदलून राहत होता. गणपतीच्या दर्शनासाठी बुधवारी तो ओळख लपवून ट्रकमधून कोल्हापूरला येत होता, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात हजर केले असता, त्याची २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली.कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला लोहितसिंग सुभेदार २००९ पासून कोल्हापुरात राहत होता. गुंतवणुकीचे सल्ले देण्यासोबतच तो काही कंपन्यांकडे एजंट म्हणून काम करीत होता. त्यानंतर काही साथीदारांसोबत त्याने ट्रेडिंग कंपन्या सुरू केल्या. २०१७ मध्ये सुरू केलेल्या एएस ट्रेडर्स कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना आकर्षित केले.
यातून आणखी काही उपकंपन्या आणि फ्रँचायझी सुरू करून त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. अखेर नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्याचे बिंग फुटले. त्यानंतर एजंट आणि गुंतवणूकदारांचा तगादा टाळण्यासाठी तो हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, मुंबई येथे सतत जागा बदलून आणि ओळख लपवून राहत होता. पोलिसांनी पुण्यातून त्याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावल्यानंतर तो स्वत:हून हजर होईल, अशी चर्चा सुरू होती.कोल्हापुरातील ओढ्यावरील गणपती मंदिरात तो दरवर्षी गणेश चतुर्थीला दर्शनासाठी जातो. यंदाही तो गणपतीच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन ठिकाणी सापळा रचला होता. लोहितसिंग मंगळवारी रात्री उशिरा वाशी येथे ट्रकमध्ये बसला. कोल्हापूरला उतरून गणपतीचे दर्शन घेऊन तो पुढे बेळगावला जाणार होता. मात्र, प्रवासाचा त्रास होऊ लागल्याने तो किणी टोल नाक्याजवळ उतरला आणि पोलिसाच्या जाळ्यात सापडला.
खंडणी वसुलीची शक्यतागुंतवणूकदारांना मोठा परतावा देणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीकडून शहरातील काही गुंडांनी खंडणी वसूल केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार त्याची चौकशी सुरू असून, यात तथ्य आढळल्यास खंडणीखोरांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.