जयसिंगपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शिरोळ तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी जयसिंगपूर येथे लोकअदालत होणार आहे. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी या मार्गदर्शन करणार आहेत.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त आपापसात तडजोनीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश आ. पां. कानडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे. लोकअदालतीमध्ये झालेल्या न्यायनिवाड्यांचे तडजोडीने समाधान दोन्ही पक्षकारांना होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षकार, अधिवक्ता आणि न्यायालयीन कर्मचारी व पॅनेल सदस्य यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संबंधित पक्षकारांची ओळख निश्चित करून लोकन्यायालयाच्या दिवशी तडजोडीमध्ये अटी व शर्ती नोंदविता येण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही कानडे व देशपांडे यांनी केले आहे.