कोल्हापूर : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक डाॅ. रमेश जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन, तर कोरोना संसर्ग काळात शववाहिकेचे सारथ्य करून मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रिया पाटील यांचा लोकराजा राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर राजर्षी शाहू स्मारक भवनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या, शनिवारी सायंकाळी बिंदू चौक येथे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान बाबा महाडीक व उपाध्यक्ष हिंदूराव हुजरे यांनी गुरुवारी दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्शाप्रमाणे काम करणाऱ्या मान्यवरांचा लोकराजा राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. यंदा हा पुरस्कार राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, समाजशास्त्र, सी. जमुनादास आणि कंपनी, शाहू छत्रपती वाद आणि वास्तव, निवडक विजयी मराठा, लोकराजा शाहू छत्रपती, भाई माधवराव बागल संक्षिप्त चरित्र आदी साहित्याचे लेखक डाॅ. रमेश जाधव यांच्या कार्याचा उचित गौरव म्हणून त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केले जाणार आहे. कोरोना संसर्गात जिथे नातेवाईकही आपल्या जवळच्या नातलगाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्याचे शव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत नाहीत. अशा काळात अगदी २१ वर्षांची प्रिया पाटील ही पुढे होऊन शववाहिकेचे सारथ्य करून या मृतदेहांचे वहन करीत आहे. तिच्या कार्याची दखल घेत तिचाही या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव मदन पाटील, उज्ज्वल नागेशकर, राजू सावंत, राम यादव आदी उपस्थित होते.
फोटो : २४०६२०२१-कोल-रमेश जाधव
फोटो : २४०६२०२१-कोल-प्रिया पाटील