कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक असताना आता शिवसेनेने (ठाकरे गट) उमेदवारीचा दावा केला आहे. मात्र, मागील निवडणुकीत धनंजय महाडिक नकोत म्हणून दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यासाठी सगळी ताकद पणाला लावली. ईर्षेने एकदा केले, आता दुसऱ्याच्या विजयासाठी ताकद खर्ची करण्यास दोन्ही काँग्रेसचे नेते तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडूनही लोकसभेची चाचपणी सुरू झाली असून ‘कोल्हापूर’च्या जागेवरून आघाडीमध्ये त्रांगडे निर्माण होऊ शकते.शिवसेनेतील फुटीनंतर येथे शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद काहीसी कमी झाली आहे. लोकसभेची निवडणूक जेमतेम वर्षावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘शिवगर्जना’ मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापुरात येत अनेकांच्या गाठीभेटी घेऊन ‘लोकसभे’ची चाचपणी केली. पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ‘कोल्हापूर’ लोकसभेसह ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी अडचणी खूप आहेत.
कोल्हापूर लोकसभेच्या सहा विधानसभा पैकी तब्बल पाच जागा दोन्ही काँग्रेसकडे आहेत. ‘राधानगरी’ची जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. येथे ठाकरे गटाचा एकही आमदार नसल्याने ही जागा सोडायची कशी? गेल्या वेळेला खासदार मंडलिक यांच्या विजयासाठी टाेकला जाऊन निवडणूक हातात घेतली; पण त्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीला फायदा काय झाला? अशी चर्चा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. तरीही भाजपला राेखायचे झाले तर एकसंधपणे निवडणुकांस सामोरे जावे लागणार आहे. यासाठी चिन्ह कोणते यापेक्षा जागा निवडून आणण्यासाठी सगळे प्रयत्न करणार, हे निश्चित आहे.
‘कसब्या’तील विजयाने आघाडीचा आत्मविश्वास दुणावला हाच फाॅर्म्युला आगामी निवडणुकीत राबवला जाणार आहे. त्यामुळे जरी शिवसेनेची ताकद कमी असली तरी लोकसभेची जागा त्यांना देऊन विधानसभेच्या उर्वरित मतदार संघात शिवसेनेची मते घेण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेसचा असू शकतो.
ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती व विजयाचे गणितशिवसेनेतील फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यांची ताकद कमी असली तरी दोन्ही काँग्रेसची ताकद आणि ठाकरेंची सहानुभूतीवर ही जागा सहज मारता येईल, असे गणित महाविकास आघाडीमध्ये मांडले जात आहे.‘राधानगरी’ राष्ट्रवादीला; ‘उत्तर’ शिवसेनेला?सहा पैकी एक जागा शिवसेना (ठाकरे गट) यांना सोडावीच लागणार आहे. मूळची शिवसेनेची असलेली ‘राधानगरी’ची जागा राष्ट्रवादीला देऊन काँग्रेसची ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा ठाकरे गटाला सोडण्याचा पर्याय आहे, मात्र येथून काँग्रेसकडून माजी आमदार मालोजीराजे किंवा त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे इच्छुक असल्याने हा गुंता शेवटपर्यंत सुटणार नाही.असे आहे ‘कोल्हापूर’ मतदारसंघातील बलाबल :कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव (काँग्रेस)कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील (काँग्रेस)करवीर : पी. एन. पाटील (काँग्रेस)कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)चंदगड : राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)राधानगरी : प्रकाश आबीटकर (शिवसेना-शिंदे गट)