कोल्हापूर : कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सूपूत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचे हातकणंगले मतदारसंघातील बंड दोन दिवसात पेल्यातील वादळ ठरले. गुरूवारी रात्री एक वाजता ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यांची बैठक झाली. अनावधनाने राहूलने हा निर्णय घेतला, पण ‘हातकणंगले’ मध्ये शेट्टींनाच पाठींबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.‘स्वाभिमानी’ आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आवाडे गटाला विश्वासात घेतले नसल्याच्या रागातून राहूल आवाडे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याने आघाडीत खळबळ उडाली होती. अहमदनगर, माढ्यातील बंडाचे लोन कोल्हापूरातही पोहचल्याने दोन्ही कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यात कमालीची अस्वस्थता होती.
गुरूवारी शेट्टी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आवाडे कुटूंबातील एकही सदस्य उपस्थित नसल्याने आवाडेंच्या बंडाची चर्चा दिवसभर सुरू राहिली. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी गुरूवारी रात्री कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व राहूल आवाडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन अनावधनाने राहूल नी उमेदवारी अर्जाचा निर्णय घेतल्याचे सांगत आवाडे कुटूंबियांसह सारी कॉँग्रेस आपल्या सोबत राहिल, अशी ग्वाही आवाडे यांनी दिली. त्यामुळे राहूल आवाडेंचे बंड थंड झाले.घरगुती अडचणीमुळेच आवाडे आले नाहीतउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेट्टी यांनी प्रकाश आवाडे यांना बोलावले होते. पण आवाडे यांच्या मातोश्री इंदूमती आवाडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याने आपण येऊ शकले नाहीत. असा खुलासा प्रकाश आवाडे यांनी केला.