कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची धग जशी तापत जाईल तसे पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते, नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी महापौर, समाजातील प्रभावी व्यक्तींचा सहभागदेखील हळूहळू वाढत आहे. पक्षीय पातळीवर आजी-माजी नगरसेवक, माजी महापौरांना प्रचारासाठीचे अधिकृत निरोप न मिळाल्याने बरेचजण आमंत्रणाची वाट पाहत आहेत. प्रचाराची धुरा खऱ्या अर्थाने वाहणाऱ्या आणि जास्तीत जास्त मतदान करून घेण्यात याच मंडळींचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे लवकरच कोण कोणाच्या बाजूने आहे हे अधिक स्पष्ट होईल.गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार वैयक्तिकरित्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. रोज काही गावे पालथी घालत होते; परंतु मतदारसंघातील प्रत्येक बुथनिहाय प्रचाराची तसेच मतदानाची जी यंत्रणा सक्रिय व्हायला पाहिजे ती अजूनही फारशी झालेली नाही.
ही यंत्रणा प्रत्यक्षात राबविण्याचे काम पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, माजी महापौर अशी मंडळी करत असतात. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेतील हा एक महत्त्वाचा घटक आणि दुवाही मानला गेला आहे. पक्षीय पातळीवर तसेच उमेदवारांकडून या मंडळींना अजूनही निरोप दिले गेलेले नाहीत.उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असून या सर्व कार्यकर्त्यांना प्रचारयंत्रणेत उतविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरात माजी नगरसेवक, माजी महापौरांच्या संघटनांच्या बैठका होऊन कोणाचा प्रचार करायचा यावर खलबते सुरू आहेत. काही जणांच्या भूमिका स्पष्ट असल्या तरी अनेक जण द्विधा मन:स्थितीत आहेत. ‘काही दिवस जाऊ देत; मग सांगतो’ अशी उत्तरे त्यांच्याकडून ऐकायला मिळतात.माजी महापौरांमध्ये ज्येष्ठ असलेले अॅड. महादेवराव आडगुळे व मारुतराव कातवरे कॉँग्रेस कार्यकर्ते असून कै. सदाशिवराव मंडलिक यांना मानणारे आहेत. मंडलिकांसोबत त्यांनी काम केले आहे; परंतु कै. मंडलिकांनी नंतर बंडखोरी केल्यानंतर आडगुळे-कातवरे पुन्हा कॉँग्रेस पक्षात गेले. मंडलिकांवरील श्रद्धेपोटी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत शिवाजी पेठेतील विलासराव सासने, भिकशेठ पाटील यांच्यासारखी बुजुर्ग मंडळीदेखील आहेत.कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण सध्या तरी धनंजय महाहिक यांच्या प्रचारात दिसत आहेत. परंतु त्यांचे पुत्र सागर चव्हाण मात्र मंडलिक यांच्याकरीता काम करत आहेत. चव्हाण कुटुंब मूळचे कॉँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असूनही त्यांच्या घरातच दोन गट पडल्याने पंचाईत झाली आहे.
आर. के. पोवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असल्याने प्रामाणिकपणे महाडिक यांच्या प्रचारात आहे. पोवार यांनी महाडिक यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. मात्र, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करून त्यांनी विरोधाची तलवार म्यान केली आहे.आणखी एक ज्येष्ठ माजी-माजी महापौर शिवाजीराव कदम शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कदम हे महाडिक यांचे जवळचे नातेवाईक असल्याने पाहुण्यांच्या प्रचारात सक्रिय होतील याच शंका नाही. सुनील कदम हेही नातेवाईक असल्याने महाडिकांच्या प्रचारयंत्रणेत प्रमुख भूमिका पार पाडतील.
बाजार समितीचे नंदकुमार वळंजू महादेवराव महाडिकप्रेमी आहेत. त्यामुळे स्वाभाविकच ते सुद्धा राष्ट्रवादीचा प्रचार करतील. शहरातील आणखी एक महत्त्वाचे घराणे असलेल्या फरास कुटुंबातील दोन माजी महापौरदेखील राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय राहतील.
संभाव्य चित्र असे असेल -
- धनंजय महाडिक - महापौर सरिता मोरे, प्रल्हाद चव्हाण, शिवाजीराव कदम, आर. के. पोवार, कांचन कवाळे, कादंबरी कवाळे, बाबू फरास, हसिना फरास, सुनील कदम, बाजीराव चव्हाण, नंदकुमार वळंजू, दीपक जाधव, प्रतिभा नाईकनवरे, सुनीता राऊत.
- संजय मंडलिक - महादेवराव आडगुळे, भिकशेट पाटील, विलासराव सासने, मारुतराव कातवरे, सागर चव्हाण, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, अश्विनी रामाणे, शोभा बोंद्रे, स्वाती यवलुजे.
- भूमिका स्पष्ट नसलेले माजी महापौर - रामचंद्र फाळके, जयश्री जाधव, राजू शिंगाडे, उदय साळोखे, शिरीष कणेरकर, सई खराडे, वैशाली डकरे, तृप्ती माळवी.
निवडणुका आल्या की पक्ष, नेत्यांना येते जागमाजी महापौर मारुतराव कातवरे यांनी राजकीय पक्ष आणि नेत्यांवर मार्मिक शब्दांत टीका केली आहे. निवडणूक आली की राजकीय पक्ष, नेते जागे होतात. त्यांना त्याच वेळी आमची आठवण होते. पाच वर्षांत कार्यकर्त्यांची कोणी दखल घेत नाही, की काय करताय, अशी साधी विचारपूसही केली जात नाही. जर कार्यकर्त्यांची अशी अवहेलना होत असेल तर मग पक्षासाठी काम करून काय उपयोग? अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.