कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा अहवाल रोजच्या रोज ‘मातोश्री’ आणि भाजप प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये ही माहिती देण्यात आली.युतीच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी झाल्यानंतर चार दिवसांच्या अंतराने गुरुवारी युतीच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळपासून आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून ज्या सूचना आल्या आहेत, त्यांचे वाचन सुनील मोदी यांनी करून प्रचाराबाबत सविस्तर सूचना दिल्या.यावेळी संजय मंडलिक म्हणाले, युतीच्या प्रचाराची सभा प्रचंड यशस्वी झाली. याबद्दल आनंदही आहे आणि भीतीही आहे. आनंद आहे कारण जिल्ह्यात या सभेमुळे वातावरण निर्माण झाले आहे आणि भीती अशी आहे की, आता सीट येणार म्हणून कार्यकर्ते निवांत राहतील; पण क्रिकेटच्या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही. हीच परिस्थिती राजकारणातही असल्यामुळे एकाही कार्यकर्त्याने शेवटचे मत मतदानासाठी येईपर्यंत आपला प्रचार थांबवायचा नाही.पदयात्रा, मेळावे, बैठका, सभांच्या परवानग्या या सर्व बाबतींत यावेळी साधकबाधक चर्चा केली. सर्व नेत्यांचे दौरे वरिष्ठांकडे पाठवायचे असून त्यानुसार वरूनही नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही प्रचाराच्या दृष्टीने सूचना केल्या. या मेळाव्याला रविकिरण इंगवले, शिवाजीराव जाधव, बाबा देसाई, संदीप देसाई, संजय पवार, विजय देवणे, राहुल चिकोडे, सुजित चव्हाण, माजी आमदार सुरेश साळोखे यांच्यासह जिल्ह्यातून आलेले प्रमुख कार्यकर्ते आणि युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गटचर्चेचे स्वरूपया मेळाव्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार नेते आणि कार्यकर्त्यांची याच ठिकाणी गटचर्चा झाली. क्षीरसागर, आबिटकर, नरके यांच्यासह त्या-त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे यावेळी प्रचाराचे नियोजन ठरवले.
तुरंबे येथून प्रचार प्रारंभसंजय मंडलिक हे सोमवारी १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता साधेपणाने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मतदारसंघातील केवळ १०० प्रमुख सेना, भाजप, आरपीआय आठवले गट, रासप, रयत क्रांतीच्या पदाधिकाºयांना बोलावण्यात आले आहे. यानंतर संध्याकाळी राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील गणेश मंदिराजवळ जाहीर सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून २००९ साली अर्ज दाखल केल्यानंतर तुरंबे येथूनच आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला होता. हाच भावनिक मुद्दा घेऊन संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा प्रारंभही येथूनच करण्यात येणार आहे.