पेठवडगाव : फडकी म्हणजे आमच्या गरिबांचा झेंडा. आमच्या फडक्याला हिणवू नका, लाठ्या-काठ्या खाऊन त्यांचे पावित्र्य आम्ही जपले आहे. आमच्यासारख्या फाटक्यांच्या नादाला लागू नका. तोंड उघडले तर अडचणीत याल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शुक्रवारी पेठवडगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूरच्या सभेत ‘दुसरी फडकी फडकवू देऊ नका,’ अशी टीका केली होती. त्याला शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी ठाकरे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला.
शेट्टी म्हणाले, ‘सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना फडक्याची किंमत काय कळणार? ज्याला फडके म्हणून हिणवता त्यातून कष्टकरी शिदोरी बांधून आणतो आणि कफन म्हणूनही तेच वापरतो. त्याचा अपमान करायच्या नादाला लागू नका. आम्हाला पैसे देऊन सभेसाठी माणसे गोळा करावी लागत नाहीत. स्वत: पैसे देऊन लोक सभा ऐकतात. हा तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे.माझे आयुष्य तुमच्यासाठीच...मी पवारांसोबत गेल्यावरून टीका होत असल्याबद्दल शेट्टी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा किस्सा सांगितला. नाना पाटील यांनी काँग्रेस, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष असा प्रवास केला. मी माझ्या रयतेच्या सुखासाठी मार्ग निवडला असे ते सांगायचे. मीही शेतकऱ्यांच्या सुखाचे पंढरपूर गाठण्यासाठी एसटी बदलली; पण माझी दिशा स्पष्ट आहे. मी १९९२ पासून शेतकºयांच्या चळवळीत आहे, त्यांची साथ कधीही सोडणार नाही. मी कोणासमोरही झुकणार नाही. पुढचे दहा दिवस माझ्यासाठी द्या. मी आयुष्यभर तुमच्यासाठीच लढत राहीन. लढणाºया माणसाबरोबरच नशीब असते त्यामुळे विजयाची खात्री आहे.’