कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडीकडे कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानी, मनसे, वंचित बहुजन आघाडीला जागा वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाटता वाटता ते जागा लढविणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होतो?, असा टोला लगावत, लोकसभा निवडणुकीची नुसती औपचारीकताच बाकी असून जनता भाजप-शिवसेना युतीलाच पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी (दि.२४) कोल्हापूरातील जाहीरसभेने सुरुवात होणार आहे. यासाठी कळंबा रोडवरील तपोवन मैदान निश्चित करण्यात आले असून त्याची गुरुवारी पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव,अशोक देसाई, आदी उपस्थित होतो.कॉँग्रेस आघाडीकडून कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्यांना भाजपच्या सहयोगी असलेल्या नवनीत राणा यांना जागा द्यावी लागली आहे. तसेच हातकणंगलेतून ‘स्वाभिमानी’च्या खा.राजू शेट्टींना, वसंतदादांच्या सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ला देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
खा. अशोक चव्हाण हे आपण बाजूला होऊन आपल्या पत्नीला उभे करतील म्हणून कॉँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर करुन टाकली. ‘स्वाभिमानी’, वंचित बहुजन आघाडी, मनसेला जागा वाटत सुटल्याने ही आघाडी स्वत: जागा लढविणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण होते, असा टोला पालकमंत्र्यांनी यावेळी लगावला.
कॉँगेसच्या काळात विविध संस्थांवर मोठी झालेली राज्यातील मोठी कुटूंबे आपल्या संस्थांची प्रगती करण्यासाठी युतीसोबत येत आहेत. त्यामुळे पुढील आठवडा खूप गाजणार आहे. आघाडीची स्थिती पाहत व युतील मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणुकीची औपचारीकताच बाकी असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.विराट सभा होईलप्रत्येक निवडणुकीत युतीचा प्रचार प्रारंभ हा मोठा व शानदार असतो. त्यानुसार ही जाहीर सभाही विराट होईल. लोकसभा निवडणुक प्रचारातही अशी सभा होणार नाही. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असून तपोवन मैदानाची पाहणी करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
प्रमुख चौकात सभेचे थेट प्रक्षेपणया सभेसाठी गांधी मैदान अपुरे पडणार असल्याने तपोवन मैदान निश्चित करण्यात आले. होणारी गर्दी पाहता आता हे मैदानही अपुरे पडेल त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्क्रिनवर सभेचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.