कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २८ मार्चपासून सुरुवात होत असून, पहिल्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवार मात्र १ ते ३ एप्रिल दरम्यानच अर्ज दाखल करण्याची शक्यता असून, त्यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारीही सुरू आहे. अर्ज दाखल केल्यादिवसांपासून उमेदवारांना खर्चाचे तपशील द्यावे लागतात आणि बहुतेकजण चांगला मुहूर्त पाहून अर्ज दाखल करत असल्याने एक एप्रिलनंतरच ही धांदल उडणार आहे.लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २८ मार्चला अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत आहे, तर ८ एप्रिलपर्यंत माघारी घेता येणार आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी नऊ दिवसांचा कालावधी असला, तरी त्यात एक रविवारची सुट्टी आहे. साधारणत: उमेदवार शुभ दिवसावरच अर्ज दाखल करतात. २८ मार्चला मध्यम दिवस असल्याने या दिवशी फार अर्ज दाखल होण्याची शक्यता कमी आहे. त्यात ४ एप्रिलला अमावस्या असल्याने १, २ व ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.खासदार राजू शेट्टी पहिल्या दिवशी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांनी अर्ज दाखल करण्याची जोरात तयारी केली असली, तरी तारीख निश्चित केलेली नाही.
खासदार धनंजय महाडिक हे १ एप्रिलनंतरच अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अद्याप कॉँग्रेससोबतच्या आघाडीची अधिकृत घोषणा न झाल्याने कॉँग्रेस कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. ही घोषणा झाल्यानंतर दोन्ही कॉँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाडिक यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर प्रा. संजय मंडलिक हे १ ते ३ एप्रिलच्या दरम्यानच अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.शेट्टी-महाडिक चर्चाखासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी रात्री खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली. शेट्टी हे आघाडीसोबत राहणार असल्याने त्यांची मदत कोल्हापूर मतदारसंघात महाडिक यांना होणार आहे; पण महाडिक यांची ताकदही हातकणंगलेसह वाळवा, शिराळा तालुक्यात आहे. तेथील मदतीबाबत चर्चा झाली. त्याशिवाय उमेदवारी अर्ज एकदम भरूया का? याबाबतही महाडिक, शेट्टी यांच्यात चर्चा झाली.
‘मातोश्री’च्या आदेशाची प्रतीक्षाशिवसेनेने कोल्हापूरमधून प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना सिग्नल दिला असला, तरी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. येत्या दोन दिवसांत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘मातोश्री’वरूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख दिली जाणार आहे.