कोल्हापूर : या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून, त्याचा लाभ विधानसभेला होणार आहे; त्यामुळे कोणी बोलावेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वत:हून बाहेर पडून प्रचार करा; पण निवडणुकीत सक्रीय व्हा, अशा सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केल्या.
लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेण्यासाठी बुधवारी काँग्रेस कमिटीत तालुकाध्यक्षांचा मेळावा झाला. या बैठकीत आवाडे यांनी मार्गदर्शन करताना वरील सूचना दिल्या. दरम्यान या मेळाव्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांचा तक्रारीचा सूर कायम होता. राष्ट्रवादीकडून प्रचाराला येण्यासाठी कोणतेही निरोप दिले जात नाहीत. जाहीरनाम्यासह प्रचाराचे कोणतेही साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही, असे असेल तर आपण त्यांच्या प्रचाराला तरी कशाला जायचे, असा संतप्त सूर जिल्हाध्यक्षांच्या समोरच तालुकाध्यक्षांनी आळवला.
भुदरगड तालुकाध्यक्ष शामराव देसाई म्हणाले, तालुक्यात अजूनही दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वय दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आम्हाला विचारातही घेत नाहीत. आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर म्हणाले, आम्हाला अजून प्रचाराचे साहित्य मिळालेले नाही. जाहीरनामा नसल्याने लोकांसमोर काय मांडणी करायची, असा प्रश्न पडला आहे. सरलाताई पाटील म्हणाल्या, रोजच्या रोज प्रचाराचे नियोजन दिले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांनीच सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तो दूर करावा.
दीपा पाटील म्हणाल्या, मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून प्रचारात सक्रीय होण्याची गरज आहे. कागल तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे म्हणाले, आम्ही स्वत:हून प्रचारात सक्रीय झालो आहोत, याची नेत्यांनी दखल घेण्याची गरज आहे.सर्व भावना ऐकून घेतल्यानंतर आवाडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून फक्त काँग्रेससाठी म्हणून प्रचारात सक्रीय व्हा, असे आवाहन केले. यावेळी संध्या घोटणे, मंगल खुडे, एस. के. माळी, संपत पाटील, नारायण थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.महिला पदाधिकाऱ्यांत वादमहिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे व चंदा बेलेकर यांच्यात बैठकीनंतर कमिटीच्या कार्यालयातच जोरदार वाद झाला. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे हे आतील कार्यालयात चर्चा करत बसलेले असतानाच या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सेल्फी फोटो काढत असताना चंदा बेलेकर यांचा हात अडवा येत असल्याने, तो काढावा, असे साळोखे यांनी सांगितले. यावरून दोघींमध्ये वादाला तोंड फुटले. कोणाच्या मागे किती लोक आहेत, कोण किती महिला गोळा करून आणते येथपासून ते कमिटीत आल्यावर कायमच पदाधिकाºयांकडून अपमान होणार असेल तर कमिटीत यायचे की नाही ते सांगा? असा पवित्रा साळोखे यांनी घेतला. हमरीतुमरीवर गेलेला वाद अखेर आवाडे यांनी दरडावून मिटविला.