कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेला त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मित्रपक्षांनी केली आहे. मतदानाला अजून जवळपास महिना असल्याने साधारणत: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच कॉँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व ‘रिपाइं’ नेत्यांच्या उपस्थितीत जंगी सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला तपोवन मैदानातूनच प्रत्युत्तर दिले जाणार आहे.राज्यात युतीचा प्रचार सुरू झाला असताना दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर एकदमच शांतता दिसत आहे. त्या-त्या मतदारसंघात आघाडीचे उमेदवार प्रचाराला लागले असले तरी कऱ्हाड वगळता एकत्रित मोठ्या सभा कोठे झालेल्या दिसत नाहीत. परिणामी दोन्ही कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात एकदिलाने सक्रिय दिसत नाहीत. त्यात युतीच्या प्रचाराचा नारळ जोरदार शक्तिप्रदर्शन करीत कोल्हापुरातून फोडल्याने शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाल्याचे दिसतात.
या सभेत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी दोन्ही कॉँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला होता. विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टीकेला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. गांधी मैदानात सभा घ्यावी, असा काहींचा मतप्रवाह आहे; पण तपोवन मैदानातच सभा घेऊन युतीला प्रत्युत्तर द्यावे, असा प्रयत्नही सुरू आहे.राष्ट्रवादीने २० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्या ठिकाणी कॉँग्रेससह मित्रपक्षांसोबत चर्चा करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर दिली आहे. त्यानुसार पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या असून, कोणत्या मतदारसंघात अडचणी आहेत, त्यांचा अहवाल पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर कॉँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या माध्यमातून जिथे दुरुस्त्या करता येतील, तिथे त्या केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही जंगी सभा घेण्याचे नियोजन आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी प्रयत्नमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवसेना-भाजपविरोधातील सभा महाराष्ट्रात होणार आहेत. त्यांतील एक सभा कोल्हापुरात घ्यावी का? त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात, याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा अभ्यास सुरू आहे.