प्रवीण देसाईकोल्हापूर : देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर छातीचे कोट करून लढणाऱ्या सैनिकांना त्यांच्या मतदानाचा बहुमोल मताचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्ससेबल पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ वाचणार आहे.इथून मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी मतदानाकरीता मतपत्रिका पाठविली जायची. ही मतपत्रिका त्यांच्यापर्यंत वेळेत न पोहोचणे, तसेच त्यांच्या पत्त्यावर न पोहोचणे अशा अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने ‘ईटीपीबीएस’प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकाच आहे.
या मतपत्रिकेला बारकोड बसविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी सैनिक मतदार आहे तेथील रेकॉर्ड आॅफिसमध्ये ही इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका उपलब्ध होणार आहे. काही क्षणांत निवडणूक यंत्रणेकडून ही मतपत्रिका सीमेवर पाठविता येणे शक्य आहे. ज्याप्रमाणे आपण एखादे कागदपत्र मेलद्वारे डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढतो. त्याचप्रमाणे या मतपत्रिकेची प्रिंट काढून त्यावर सैनिक मतदान करून ते पोस्टाद्वारे निवडणूक यंत्रणेकडे पाठविणार आहेत.सैनिकांना मतदान करण्याची प्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असली तरी ते मतदान पोस्टाने पाठविण्याची प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणेच आहे. मतपत्रिका पाठविण्यासाठी लागणारा कालावधीमुळे वाचणार आहे. यासंदर्भात निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नवीन प्रणाली अवगत करून लवकरात लवकर इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका संबंधित सैनिकांपर्यंत कशी पोहोचेल अशा पद्धतीने प्रत्येकाने नियोजन करावे, असे निर्देशही निवडणूक आयोगाकडून निवडणूक यंत्रणेला देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सैनिकी मतदारविधानसभा मतदारसंघ मतदारचंदगड १८९१राधानगरी ९१४कागल १४७३करवीर ५६२कोल्हापूर दक्षिण ३९९कोल्हापूर उत्तर ६९शाहूवाडी १०४५हातकणंगले ३२७इचलकरंजी १०४शिरोळ ४८५एकूण ७२६९