विश्र्वास पाटील कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सांगणारा कोल्हापूर जिल्हा महिलांना राजकीय स्थान देण्यात मात्र खूपच मागे असल्याचे चित्र दिसत आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत कशाबशा चार आमदार व दोनच महिला खासदारांना निवडून दिले आहे. ज्या निवडून आल्या आहेत, त्यादेखील प्रस्थापित राजकीय घराण्यांतीलच आहेत. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत महिलांचे मतदान निम्मे आहे; परंतु विधानसभा व लोकसभेला मात्र महिलांना पुरेशा प्रमाणात संधी मिळाली नसल्याचे वास्तव आहे.लोकसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र असते. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रात लोकसंपर्क, संघटनात्मक बळ आणि आर्थिक ताकद यांचा विचार उमेदवारी देताना कायमच होतो. त्यामुळेच ही निवडणूक लढवून उत्तम काम करून दाखवू शकतील, अशा महिला असतानाही त्यांना संधी मात्र मिळाल्याचे दिसत नाही.
पहिल्या महिला खासदार म्हणून विजयमाला राणीसाहेब छत्रपती यांना १९६७ ला लोकांनी निवडून दिले. त्यांच्याविरोधात मेजर जनरल एसपीपी थोरात काँग्रेसकडून रिंगणात होते; परंतु त्यावेळी जिल्ह्यात दत्तक प्रकरण गाजले होते व त्या चळवळीच्या प्रतीक म्हणून शेतकरी कामगार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.
थोरात यांच्या प्रचारासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या; परंतु कोल्हापूरने थोरात यांचा पराभव केला. विशेष धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापूर मतदारसंघात आजअखेर एकही महिला खासदार झालेली नाही. ज्या दोन्ही महिला खासदार झाल्या, त्या पूर्वीच्या इचलकरंजी व आताच्या हातकणंगले मतदारसंघातून.
श्रीमती निवेदिता माने यांनाही माने घराण्याचा राजकीय वारसा होता. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले होते; त्यामुळे महिला म्हणून नव्हे तर त्या घराण्याच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांना ही संधी मिळाली. विधानसभेला विमलाबाई बागल यांचा अपवाद वगळता अन्य तीन महिला आमदारांच्या बाबतीत घराण्यातील सत्ता पुढे चालू राहावी यासाठीच महिलांना ही संधी दिल्याचे चित्र दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिलांना संधी मिळत आहे; परंतु त्यासाठी आरक्षण कारणीभूत आहे. आरक्षण नव्हते तेव्हा त्या स्तरांवरही फारशी समाधानकारक स्थिती नव्हती.
सरंजामी वृत्ती आणि पुरुषसत्ताक मानसिकता अजूनही घट्ट असल्याने महिलांना राजकारणात पुरेशी संधी मिळत नाही. ही स्थिती कोल्हापुरातच नव्हे तर देशातही आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने रुजली नाही याचेच हे द्योतक आहे. एकाच कुटुंबात मुलगा आणि मुलगी सक्षम असली तरी संधी मुलालाच मिळते, हे वास्तव आजही आहे.- डॉ. माया पंडितडाव्या चळवळीतील कार्यकर्त्या
आतापर्यंतच्या खासदार
- इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ : विजयमाला राणीसाहेब छत्रपती (१९६७-शेकाप)
- हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : श्रीमती निवेदिता माने (१९९९, २००४ राष्ट्रवादी)
यांनीही लढवली लोकसभा निवडणूक :
- कोल्हापूर मतदारसंघ - सुनंदा मोरे (शेकाप-२००४),
- डॉ. निलांबरी रमेश मंडपे (अपक्ष-२००९)
- हातकणंगले मतदार संघ - डॉ. माया पंडित (माकप- १९९८),
- सुनीता अरविंद माने (अपक्ष-२००४)
आतापर्यंतच्या आमदार
- कागल मतदारसंघ : विमलाबाई बागल (१९५७-शेकाप)
- शिरोळ मतदारसंघ : सरोजिनी खंजिरे (१९८५-काँग्रेस)
- शाहूवाडी मतदारसंघ : संजीवनी गायकवाड (१९९८-काँग्रेस)
- चंदगड मतदारसंघ : संध्यादेवी कुपेकर (२०१४-राष्ट्रवादी)
यांनीही लढवली विधानसभा निवडणूक
- राधानगरी-भुदरगड : श्रीमती तारामती कडव (१९८५- काँग्रेस)
- कोल्हापूर शहर : श्रीमती शिवानी देसाई (१९९५-काँग्रेस)
- शिरोळ : श्रीमती रजनी मगदूम (२००४-काँग्रेस)
- कोल्हापूर मतदारसंघ स्त्री-मतदार : ९ लाख १३ हजार ४३३
- हातकणंगले मतदारसंघ स्त्री-मतदार : ८ लाख ५३ हजार ५९६