कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे उद्या, गुरुवारी तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक हे सोमवारी (दि. १) आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचे अद्याप निश्चित झाले नसून, ते सोमवार किंवा मंगळवारी (दि. २) अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराचा पारा चांगलाच तापू लागला आहे. सभांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन जोरात सुरू आहे. निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करणे आहे. तारीख व वेळ पाहूनच बहुतांश उमेदवारी अर्ज दाखल करतात. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या, गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.
आघाडीचे हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार खासदार राजू शेट्टी हे उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फारसे शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, ‘रिपाइं’चे स्थानिक नेते सहभागी राहणार आहेत.
कोल्हापूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक हे सोमवारी दुपारी एक वाजता अर्ज दाखल करणार आहेत. साध्या पद्धतीने दोन्ही कॉँग्रेस, स्वाभिमानी, ‘रिपाइं’च्या नेत्यांसह मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन ते अर्ज दाखल करणार आहेत.युतीचे कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने यांचे अर्ज दाखल करण्याचा दिवस निश्चित झालेला नाही. साधारणत: सोमवारी किंवा मंगळवारी ते दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना आणण्याचा माने यांचा प्रयत्न आहे.