दत्ता बिडकर ।हातकणंगले : तालुक्यामध्ये महाआघाडी विरुद्ध युती असे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या आवळे-आवाडे गटाची दिलजमाई आणि ऊसउत्पादक शेतकरी ही ‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टी यांची जमेची बाजू असून, महाआघाडीच्या पाठिंब्यावर ते गतवेळचे मताधिक्क्य कायम राखण्यात यशस्वी होणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.
शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांचा होमपिच तालुका असला तरी माने गटाचे कार्यकर्त विखुरले आहेत. त्यांची मोट बांधण्याबरोबरच शिवसेनेमधील गटबाजी शमविण्यामध्ये त्यांना आपले कसब पणाला लावावे लागणार आहेत. ‘जनसुराज्य’च्या राजीव आवळे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. महाडिक गट कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, हे अद्याप स्पष्ट नसल्याने युती आणि महाआघाडीची धाकधूक वाढली आहे.
तालुका अडीच ब्लॉकचा असल्याने हातकणंगले आणि इचलकरंजी असे दोन विधानसभा मतदारसंघ या तालुक्यामध्ये समाविष्ट आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील गाव तिथे गटबाजी उफाळून आलेली आहे. काँग्रेस (आय)चे माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री जयवंत आवळे यांचे जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्रात दोन वेगवेगळे गट आहेत. उर्वरित तालुक्यामधील गावांमध्ये काँग्रेसबरोबर शिवसेना, जनसुराज्य आणि महाडिक गट, भाजप आणि राष्ट्रवादीचा यड्रावकर गट अशी गटबाजी उफाळून आली आहे.
सर्वच गट आपापली ताकद दाखविण्यासाठी सज्ज आहेत. आवाडे-आवळे गटाचे गावपातळीवरील हेवेदावे आणि गावातील एकमेकांची ताकद दाखविण्याच्या ईर्ष्येने गटाचेच अस्तित्व संपून जात असल्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आवळे-आवाडे गटाने दिलजमाई केली आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शरद साखर कारखाना कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीची मोट बांधली आहे.
महाआघाडीच्या नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, तर राजू शेट्टी हे गतवेळचे मताधिक्य यावेळीही कायम राखण्यात यशस्वी होतील का, हे काळच ठरविणार आहे.भाजप-शिवसेना, रासप मित्र पक्ष युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली. गेली दहा वर्षे माने गटाचा गावपातळीवर संपर्क तुटला आहे. अरुण इंगवले, हिंदुराव शेळके, अशोक स्वामी यांच्यासारखे माने गटाचे शिलेदार भाजपवासी झाले आहेत.
धैर्यशील माने यांना माने गटाची नव्याने मोट बांधावी लागणार आहे. तसेच शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यातील गटबाजी शमविण्यामध्ये कसब पणाला लागणार आहे. तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेचे पाच सदस्य तसेच हुपरी नगर परिषदेची सत्ता भाजपकडे आहे. पेठवडगाव नगरपालिकेमध्ये युवक क्रांती सालपे गटाची सत्ता आहे. नगराध्यक्ष भाजपकडे, तर इतर नगरसेवक सोयीप्रमाणे राजकीय सोय पाहणारे आहेत. युवक क्रांतीच्या नेत्या प्रविता सालपे राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील उपाध्यक्षा आहेत. त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. जातीय समीकरणाचा वापर युतीकडून आतापासूनच सुरू असल्यामुळे राजू शेट्टींविरुद्ध जातीचे कार्ड प्रभावी ठरणार का? याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे. तालुक्यामध्ये जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
‘जनसुराज्य’चे विनय कोरे यांनी नेहमीच स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना विरोध केला आहे. विनय कोरे भाजप-सेनेबरोबर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हातकणंगले आणि पन्हाळा-शाहूवाडीचे विद्यमान आमदार शिवसेनेचे असल्याने सहा महिन्यांनंतर धनुष्यबाणाचे काय करायचे, असे त्रांगडे राजीव आवळे आणि विनय कोरे यांचे झाल्यामुळे जनसुराज्यने भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचीही तालुक्यातील गावागावांमध्ये स्वतंत्र ताकद आहे. सूनबाई शौमिका महाडिक भाजपच्या जि. प. अध्यक्षा आहेत. महाडिक गटाची या निवडणुकीत कोंडी झाली आहे. शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेतल्यास याचे परिणाम कोल्हापूर लोकसभेमध्ये उमटणार आहेत. त्यामुळे महाडिक गट कोणाच्या पारड्यात वजन टाकणार यावर महाआघाडी की युतीच्या उमेदवाराला मताधिक्य हे ठरेल. दोन्हीकडेही धाकधूक वाढली आहे.हातकणंगले विधानसभा मतदान२०१४ मध्ये २,९८,९९६ मतदार होते. त्यामध्ये १९,९६२ मतदारांची वाढ झाली आहे. एकूण मतदार : ३,१८,९५८जिल्हा परिषद : ११ सदस्यभाजप-५, जनसुराज्य- २, आवाडे-ताराराणी कॉग्रेसविलीन-२, शिवसेना-१, स्वाभिमानी-१.पंचायत समिती : २२ सदस्यभाजप-६, जनसुराज्य-५, शिवसेना-२ जनसुराज्यचा सभापती, उपसभापती यांची सत्ता आवाडे काँग्रेसविलीन ताराराणी-५, स्वाभिमानी -२, अपक्ष -१, कॉग्रेस-१.
हुपरी नगर परिषद : १८नगराध्यक्ष - भाजपभाजप नगरसेवक -७, आवाडे काँग्रेस-५, अपक्ष -२, मनसे-२, शिवसेना-२.पेठवडगाव नगरपालिका : १७नगराध्यक्ष - युवक क्रांती आघाडी (भाजपला पाठिंबा).नगरसेवक - १३ युवक क्रांती आघाडी, ४ यादव गट.तालुक्यामधील संस्था : साखर कारखाने : जवाहर - प्रकाश आवाडे. शरद - राजेंद्र पाटील-यड्रावकर. पंचगंगा - पी. एम. पाटील.