Shahu Maharaj Chhatrapati and Sanjay Mandalik : राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.७) मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कमी झालेले मतदान ही चिंतेची बाब असताना कोल्हापुरात आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वाधिक मतदानाचा विक्रम झाला आहे. लोकसभेसाठी कोल्हापुरातून ७१.५९ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे आता या अत्यंत चुरशीच्या लढतीत शाहू महाराज बाजी मारणार की संजय मंडलिक? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असला तरी आतापासूनच कोल्हापूरात आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कुठल्या मतदारसंघात कुणाला लीड मिळाले? कुठे कुणाचं गणित बिघडले? कोण किती मताधिक्य घेणार? अशी चर्चा आता शहर आणि खेड्यापाड्यातील कट्ट्यांवर रंगली आहे. तसेच, राजकारणातील जाणकार मंडळी आणि नेतेमंडळींकडून आपापले अंदाज लावले जात आहेत. त्यामुळे अंतिम निकाल समोर येईपर्यंत अशा चर्चांमध्ये कोल्हापूरकर दंग असतील.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले, तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन आणि तालुकानिहाय प्रचारावर जोर दिला होता. त्यामुळे आता प्रचार, रणनीती आणि मंगळवारी झालेले मतदान यांचा आढावा घेतल्यास शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात अटीतटीची निवडणूक झाल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच, दोन्ही बाजूंकडून आपापल्या विजयाचे दावे केले जात आहेत.
मंगळवारी झालेल्या मतदानानंतर स्थानिक पदाधिकारी, राजकीय जाणकार यांच्यात ज्या चर्चा सुरू आहेत, त्यांचा आढावा घेतला असता करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर भागात शाहू महाराज यांचा प्रभाव मतदानावेळी जाणवत होता. त्यामुळे या भागात शाहू महाराज यांना चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर राधानगरी, कागल आणि चंदगडमध्ये संजय मंडलिक बऱ्यापैकी मुसंडी मारतील असे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या या अटीतटीच्या लढतीत कोणाची सरशी होणार, हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.
उच्चांकी मतदान
पुरोगामी विचारांचा वारसा आणि सजग नागरिकांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा ते लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये कायमच जिल्ह्यात सर्वाधिक मतदान होते. मतदानाची हीच परंपरा कायम राखत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकांमधील सर्वाधिक मतदानाची आकडेवारी मागे टाकत मंगळवारी कोल्हापूरकरांनी उच्चांकी मतदान केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ७९.६१ टक्के मतदानाची नोंद करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे, तर सर्वात कमी मतदानाची नोंद कोल्हापूर उत्तरमध्ये ६५.३१ टक्के झाली आहे. याशिवाय, चंदगडमध्ये ६८.४१ टक्के, कागलमध्ये ७५.३१ टक्के, कोल्हापूर दक्षिणमध्ये ७०.७९ टक्के आणि राधानगरी ६८.७७ टक्के मतदान झाले.
दोन्ही उमेदवारांकडून ताकदीने प्रचार!
संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या एक महिन्यात तब्बल चार वेळा कोल्हापूरचा दौरा केला. कोल्हापुरातील आजी-माजी नगरसेवक, साखर कारखाने, गोकुळ ते सहकारी संस्थापर्यंत अनेकांशी थेट संपर्क साधत संजय मंडलिक यांच्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपाचे खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर अशा प्रमुख नेत्यांनी उचललेली होती.
दुसरीकडे, आमचं ठरलंय कोणाला मतदान करायचं, असं म्हणत शाहू महाराजांच्या प्रचाराची संपूर्णतः जबाबदारी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. शाहू महाराजांच्या प्रचारार्थ शिवशाहू निर्धार सभा गांधी मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. या सभेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार केला आहे. कोल्हापूरसाठी छत्रपती शाहू घराणे हा अत्यंत नाजूक मुद्दा असल्याने त्यांचा प्रभाव मतदानामध्ये दिसून आल्याची चर्चा आहे.