विश्र्वास पाटीलकोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर जमा झाले.
ही रक्कम मिळावी म्हणून त्या गेली सव्वाचार वर्षे ‘महावितरण’कडे हेलपाटे मारत होत्या. त्यांनी साधा एक अर्ज पोस्टाने ‘लोकमत हेल्पलाईन’ कडे पाठविला व त्याची दखल घेऊन ‘लोकमत’ने हा विषय धसास लावला. त्यासंदर्भातील वृत्त ६ फेब्रुवारीस प्रसिद्ध झाले होते.‘महावितरण’ने एनएफटी करून श्रीमती कुंभार यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली.कुंभार यांचा दि. २ मे २०१४ ला कामावर असताना पिशवी येथे अपघाती मृत्यू झाला, तेव्हापासून या रकमेसाठी त्या पाठपुरावा करत होत्या. त्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन व वैद्यकीय बिलांची रक्कम मिळाली नाही. ‘लोकमत’ने त्यासंबंधी ‘महावितरण’च्या कोल्हापूर व मुंबई कार्यालयात जाब विचारला.
वीज मंडळाचाच कर्मचारी, त्यातही डांबावर चढले असताना अपघाती मृत्यू होऊनही त्यांचेच जुने सहकारी मात्र या कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीस न्याय द्यायला तयार नव्हते. ‘देतो’, ‘करतो’ अशी आश्वासने त्या ऐकत होत्या. तब्बल आठवेळा श्रीमती कुंभार यांनी कागदपत्रांची पूर्तता केली तरी महावितरण पैसे देत नव्हते; परंतु हे सगळे प्रश्न ‘लोकमत’मधील एका बातमीने सोडविले व त्या असाहाय्य महिलेस न्याय मिळाला.