कोल्हापूर : आर. के. नगर येथील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)चे ग्राहक सेवा केंद्रातील बिल भरणा केंद्र मनमानी पद्धतीने गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.उतारवयात नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे हे एकमेव साधन असून, बिल न भरल्याने तेही खंडित होत आहे. ग्राहकांची सेवेसाठी असलेल्या या केंद्राच्या भोंगळ कारभाराचा फटका ज्येष्ठांना बसत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अतुल देसाई यांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे कैफियत मांडली.आर. के. नगरसह आसपासच्या उपनगरासाठी आर. के. नगर ग्राहक सेवा केंद्र कार्यरत आहे. या कार्यालयात दूरध्वनीची बिले जमा करून घेण्यासाठी बिल भरणा केंद्रही आहे; परंतु गेल्या चार दिवसांपासून हे केंद्रच बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसला आहे. बहुतांश सर्वच जणांकडे आता मोबाईल असल्याने ही बिले तरुणाईसह आॅनलाईन भरली जातात; परंतु अद्यापही ‘बीएसएनएल’चे दूरध्वनीही अनेक जणांकडे आहेत.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्याजवळ नातेवाईकांसह बाहेरगावी असलेल्या आपल्या पाल्यांशी संपर्क साधण्याचे दूरध्वनी हे एकमेव माध्यम आहे. ते अखंडित राहावे; यासाठी बिल आल्यानंतर तातडीने ते भरण्यासाठी येत असतात. आर. के. नगर परिसरातील ग्राहक सेवा केंद्रातही अशाच पद्धतीने गेल्या चार दिवसांपासून या ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे सुरू झाले आहेत; परंतु त्यांचे बिल भरून घ्यायला या ठिकाणी कॅशिअरच हजर नसल्याचे चित्र आहे.
इतर अधिकाऱ्यांशी विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. सध्या सुरू झालेल्या उन्हाच्या तडाख्यातही ज्येष्ठ नागरिक पायपीट करत येथपर्यंत येत आहेत; परंतु वीज बिल भरणा केंद्राला कुलूप पाहून त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या आप्तेष्टांसह नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे एकमेव साधन म्हणजे दूरध्वनी आहे. त्याचे बिल वेळेवर भरले नाही, तर ‘बीएसएनएल’कडून दूरध्वनी खंडित केला जातो. असे असताना हे बिल भरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बिल भरणा केंद्रच बंद असल्याच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. कॅशिअर नसल्याने ते बंद केल्याचे सांगितले जात असले, तरी या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी ‘बीएसएनएल’ची आहे.- अतुल देसाई, सामाजिक कार्यकर्ते