कोल्हापूर : महापालिकेच्या उद्यान विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर तसेच अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल वर्षानुवर्षे घेतली जात नाही. परिणामी एक फांदी तोडण्यासाठी नागरिकांना वर्षानुवर्षे या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.गेल्या वर्षभरात खासगी व महापालिकेच्या हद्दीतील ७५० वृक्षतोडींचे अर्ज महापालिकेच्या उद्यान विभागाकडे आले. त्यांतील १४० अर्जांची निर्गत करून त्यान्वये वृक्षतोड करण्यात आली. ६१० अर्ज नामंजूर करण्यात आले; तर उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी पहिल्या सहामाहीत २६६ अर्ज वर्षभरात कार्यालयाकडे आले होते. त्यांपैकी २१६ अर्जदारांच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या; तर ५० अर्ज नामंजूर करण्यात आले.
दुसऱ्या सहामाहीत २२३ अर्ज महापालिका हद्दीतील आले होते. त्यांपैकी ८९ अर्ज मंजूर करण्यात आले; तर खासगी ५५ अर्जांपैकी ३४ अर्ज नामंजूर करण्यात आले. ही झाली कार्यालयाची स्थिती; तर सिद्धाळा गार्डन परिसरातील सतीश सावर्डेकर यांनी गेल्या वर्षी उद्यानातील एका झाडाच्या फांद्या वादळी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यात व घरावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता असून, त्या छाटण्याकरिता अर्ज केला होता.
हा अर्ज १ जून २०१८ रोजी मंजूर केला. त्यानंतर सावर्डेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर २७ नोव्हेंबर २०१८ रोजी फांद्या उंच असल्याने तिथे बूम पोहोचत नसल्याने पुन्हा अर्ज अन्य यंत्रणेमार्फत फांद्या तोडण्याची कार्यवाहीकरिता ठेवण्यात येत असल्याचे पत्र त्यांना देण्यात आले. त्यानंतरही सावर्डेकर यांनी आयुक्तांची भेट घेतली.
पुन्हा त्यांनी फांद्या छाटण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे एक फांदी छाटण्यासाठी अर्जदाराला वर्षभर फेऱ्या व पाठपुरावा करावा लागत आहे. अशा झाडांची योग्य ती खबरदारी घेऊन तत्काळ कार्यवाही करणे महापालिकेला कधी शक्य होणार आहे? असा सवालही नागरिकांतून विचारला जात आहे.
गेले वर्षभर मी सिद्धाळा गार्डन येथील रबराच्या झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी अर्ज-विनंत्या करीत आहे. झाड उंच असल्यामुळे बूम पोहोचू शकत नसल्याचे कारण या विभागाकडून दिले जात आहे. वादळी पावसात फांद्या पडून हानी झाल्यास त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे, असा माझा सवाल आहे.- सतीश सावर्डेकर
खात्याचा कारभार अपुऱ्या कर्मचऱ्यांवरउद्यान कार्यालयाकडे एक मुख्य बाग अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक दोन पदे, तर पहारेकरी १०८, माळी १०८ अशी सुमारे ३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत प्रभारी अधीक्षकांसह १५० कर्मचारी वर्ग या कार्यालयाकडे आहे. त्यातील प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे खात्याचा कारभार अपुऱ्या कर्मचऱ्यांवर सुरू आहे.अधिकाऱ्यांनीच घेतल्या बागा दत्तकशहरात ५४ महत्त्वाच्या बागा आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने त्यांची दुरवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. अधिकाऱ्यांनी काही बागांची जबाबदारी स्वीकारली आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांकडून या बागा पुन्हा फुलविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. यात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ताराबाई गार्डन, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी हुतात्मा पार्क, तर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी नाळे कॉलनी येथील बाग दत्तक घेतली आहे.