कोल्हापूर : दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत.मूळचे मुंबईकर असलेल्या अमरजितसिंग चावला यांनी नागपूर येथे झालेली २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण करीत उपस्थितांचे लक्ष वेधले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत ८३ अर्धमॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण केल्या आहेत. यासह दहावेळा पुणे मॅरेथान व तीनवेळा अल्ट्रा रन (दीर्घ धावणे) पूर्ण तसेच ४९ वेळा १० किलोमीटर शर्यत पूर्ण करणारे चावला यांचे लक्ष्य १०१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे हे आहे.बीब कलेक्शनसाठी आलेले चावला एस्कॉर्ट असलेले युवा लाझर नाडर व डॉ. अमितसिंग माने यांच्यासह कोल्हापुरात दाखल झाले. याबाबत बोलताना धावपटू चावला म्हणाले, कोल्हापुरातील ‘लोकमत’ची ही माझी ८४ वी मॅरेथॉन आहे. वयाच्या तेराव्या वर्षी ‘मॅकेलर डिजनरेशन’ या असाध्य आजाराने माझी दृष्टी कमी आली. त्यानंतर ४०व्या वर्षी मला दोन्ही डोळ्यांना दिसणे पूर्णत: बंद झाले. यावर मी जीवनात हरलो नाही.
आयुष्यात काहीतरी करण्यासाठी माझे मन मला काही स्वस्थ बसू देईना. २००५ साली वयाच्या ४९व्या वर्षी मी एका शर्यतीत सहभाग घेतला आणि ती पूर्णही केली. त्यानंतर मी मागे बघितले नाही. ‘लोकमत सर्किट रन’च्या रूपाने हा उपक्रम सर्वांना धावण्याची सवय लावण्यासारखा आहे. तुम्हीही सवय लावून घ्या. मला शंभरपेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये धावायचे आहे.
रन फॉर लाईफमाणसाच्या शरीराला व्यायाम नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे. परिणामी त्या व्यक्तीला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते; म्हणून प्रत्येकाने जीवनात व्यायाम करणे आवश्यक नव्हे, तर सक्तीचे आहे. त्यात धावणे हा स्वस्तातील व्यायाम आहे. स्वास्थ्य उत्तम तर सर्व जीवन सुरळीत होते. त्यामुळे जगण्यासाठी धावणे आवश्यक आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ ही करवीरकरांना मोठी पर्वणी ठरली आहे. हीच ‘लोकमत’ची क्रीडासंस्कृती चिरकाल राहो.-तिरूपती काकडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक