कोल्हापूर : पहाटेची नीरव शांतता, पोलीस क्रीडांगणाच्या दिशेने सुरू असलेली लगबग, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील सळसळता उत्साह, मनात अभूतपूर्व आत्मविश्वास, लक्ष ध्येयाकडे आणि मनात जिद्द फक्त जिंकण्याची! आबालवृद्धांची झालेली प्रचंड गर्दी आणि अशा गर्दीच्या साक्षीने काउंटडाऊन सुरू होते... फाईव्ह... फोर... थ्री... टू... वन अॅँड नाऊ स्टार्ट.
नुसते शब्द कानांवर पडताच एका क्षणात हजारो पावले ध्येयाकडे वळले. आकाशातील आतषबाजी आणि झांजेच्या आवाजाने बेभान झालेले कोल्हापूरकर सुसाट धावले. निमित्त होते... ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत आणि वारणा दूध सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन’ स्पर्धेचे!
फुटबॉल आणि कुस्तीत इतिहास रचणाऱ्या कोल्हापूरकरांनी आता या मॅरेथॉन स्पर्धेनेही इतिहासातील एक सुवर्णपान रविवारी लिहिले. आजवरच्या सर्व मॅरेथॉन स्पर्धांतील ही सर्वांत मोठी मॅरेथॉन म्हणून तिने रेकॉर्ड प्रस्थापित केले.या मॅरेथॉनच्या २१ किलोमीटरच्या पुरुष गटात नेसरीच्या (ता. गडहिंग्लज) अमित पाटील, प्रौढ गटात कोल्हापूरच्या पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकविला.
२१ किलोमीटर डिफेन्सच्या पुरुष गटात कोरोेची (ता. हातकणंगले) येथील दीपक कुंभार, १० किलोमीटर महिला गटात ‘कोल्हापूर पोलीस’च्या सोनाली देसाई आणि महिलांच्या प्रौढ गटात औरंगाबादच्या अनुराधा कच्छवे या अव्वल ठरल्या.‘लोकमत करतंय म्हटल्यावर जबरदस्तच असणार’ यावर ठाम विश्वास असलेल्या कोल्हापूरकरांनी मॅरेथॉन स्पर्धा पाहण्याकरिता अखंड २१ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली, हाही एक अभूतपूर्व प्रसंग म्हणूनच गणला जाईल. स्पर्धेची रंगत, चुरस आणि ईर्षा वाढविण्याकरिता मॅरेथॉन चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून धावपटूंना प्रोत्साहित केले.
याशिवाय ठिकठिकाणी चौकात मर्दानी खेळांच्या पथकांनी, झांजपथकांनी, स्कूल बॅँड, पोलीस बॅँडच्या पथकांनी सूर -तालाच्या गजरात प्रोत्साहन दिले. हलगी-घुमके आणि तुतारीने तर रणांगणावरील या धावपटूंच्या शौर्याला एक प्रकारची सलामीच दिली.
मॅरेथॉन स्पर्धक विशिष्ट मार्गाने धावले असले तरी त्याची धून अवघ्या कोल्हापूरवर पसरली होती. त्यामुळे धावणारे स्पर्धक आणि त्यांना टाळ्या वाजवून दाद देणारे क्रीडाप्रेमी कोल्हापूरकर असेच चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.गेले महिनाभर या महामॅरेथॉनची केवळ कोल्हापुरातीलच नाही तर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, आदी जिल्ह्यांतील धावपटूंच्या कुतूहलाचा विषय बनून गेला होता. त्यामुळेच या जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतून धावपटू स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून एक विशिष्ट मर्यादेवर नावनोंदणी थांबविण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेता आला नाही, त्यांनी सहभागी धावपटूंना ‘चीअर अप’करण्यात आनंद मानला.
स्पर्धेचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य असे की, सहकुटुंब, मित्रपरिवार, राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शासकीय अधिकारी, विद्यार्थी यांच्यासह अनेक संस्थांच्या सदस्यांनी एकत्रित सहभाग नोंदवून धावण्याचा आनंद लुटला.
दिव्यांग, मतिमंद विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सहभाग नोंदवीत स्पर्धा पूर्ण करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. बालकल्याण संकुलातील अनाथ-निराधार मुलेही तितक्याच उत्साहाने स्पर्धेत धावली व आम्हीही कुठल्याही स्पर्धेला जणू तयार असल्याचे प्रत्यंतर घडविले.कमालीची उत्कंठा लागून राहिलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेने अखेर सकाळी सव्वासहा वाजता उत्साहाचा अत्युच्च क्षण गाठला. महापौर स्वाती यवलुजे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, पुुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राजुरी स्टीलचे दिलीप शहा, ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, ‘महामॅरेथॉन’च्या प्रमुख संस्थापिका रुचिरा दर्डा, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख,संपादक वसंत भोसले, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्र्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, प्रा. भरत खराटे,आदींनी ‘फ्लॅग आॅन’ करून सर्वांत प्रथम २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुरुवात केली.
त्यानंतर प्रत्येकी दहा मिनिटांच्या अंतराने १० किलोमीटर, ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. स्टार्टिंग पॉइंटवर सुटतेवेळी प्रत्येक गटातील स्पर्धकांना प्रोत्साहित करताना मुलींच्या झांजपथकाने तसेच आतषबाजीने चांगलाच रंग भरला. मैदानावर उपस्थित असणाऱ्या क्रीडाप्रेमींनी टाळ्यांचा गजर करीत शुभेच्छा दिल्या.स्पर्धा संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल सर्वच स्पर्धकांना यावेळी मेडल देण्यात आले. मेडल गळ्यात पडले तेव्हा अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे ,राजुरी स्टीलचे नंदकुमार शाह, दिलीप शहा, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, उद्योगपती व्ही. बी. पाटील, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव, वारणा दूध संघाचे संचालक महेश शिंदे, जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, प्रदीप देशमुख, सचिव के. एम. वाले, एस. एम. मगदूम, आर. बी. देसाई, पी. व्ही. कुलकर्णी, सचिन माने, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, एच. डी. एम. ग्रुपचे राजेंद्र नेर्लीकर, हॉकी पंच रमा पोतनीस, श्वेता पाटील, युथ आॅलम्पिक विजेता नेमबाज शाहू माने, मर्क कंपनीचे गौरव चढ्ढा, महालक्ष्मी इस्पातचे जितूभाई गांधी, सनी डिस्ट्रिब्युटर्सचे संजय शेटे, रेड्डीज लॅबचे राजू इंगळे, हॉटेल केट्रीचे चिन्मय कडेकर, संदीप युनिव्हर्सिटीचे डॉ. संदीप जयराट, रेडिओ सिटीचे ओंकार थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते.
हजारो धावपटूंनी दिला आरोग्यदायी संदेशएकंदरीत पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत पोलीस मैदानावरील वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. स्पर्धेचे अंतर पूर्ण करून आल्यानंतर स्पर्धकांनी एकमेकांचे अभिनंदन केले. कुतूहलापोटी स्वत:ची छायाचित्रे काढून घेतली. कोणी गटागटाने तर कोणी सेल्फी पॉर्इंटवर छायाचित्रे काढून घेण्यात व्यस्त होते.
जेव्हा निकाल हाती आले तेव्हा स्पर्धेत जिंकलो यापेक्षा सहभागी झालो आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसला. ‘लोकमत’च्या मॅरेथॉनमध्ये ‘मी धावतो माझ्यासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या हजारो धावपटूंनी इतरांनीही स्वत:च्या आरोग्यासाठी ‘रोज धावा’ असा सामाजिक तसेच आरोग्यदायी संदेश दिला.
सर्वपक्षीय उपस्थिती..‘लोकमत’च्या या महामॅरेथॉनच्या उदघाटनासाठी भल्या पहाटे दोन्ही काँग्रेससह भाजप,शिवसेना,जनसुराज्य आदी पक्षांचे जिल्ह्यातील मातब्बर नेते आवर्जून उपस्थित राहिले. फ्लॅग आॅफ व बक्षीस समारंभाच्या निमित्ताने एवढ्या सगळ््या मान्यवरांना ‘लोकमत’ ने एका व्यासपीठावर आणले.