कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉनच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आवर्जून भल्या पहाटे पोलीस मैदानावर धाव घेतली. या सर्वांनीच उपस्थित स्पर्धकांची फोटो काढण्याची हौस भागविली. हजारोजणांनी या सर्व आपापल्या आवडत्या नेत्यांसमवेत फोटो काढून घेतले.इतक्या पहाटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांचा सहभाग पाहून, उपस्थित नेतेही अचंबित झाले. सुरुवातीला खासदार धैर्यशील माने यांनी मैदानावर हजेरी लावली. उपस्थितांशी गप्पाटप्पा करीत त्यांनी पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन स्पर्धा पूर्णही केली.यापाठोपाठ खासदार संभाजीराजे, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे सर्वजण आले. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारीत असताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे आगमन झाले. यावेळी सर्वांच्या चर्चेचा सूर हाच होता की, आरोग्यविषयक जाणिवा वाढल्या असून, ‘लोकमत महामॅरेथॉन’मुळे आम्हा नेतेमंडळींनाही आता लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.या सर्वांच्या हस्ते विविध अंतरांच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्यानंतर बक्षीस वितरणाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले. त्यांच्यापाठोपाठ खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील हेदेखील आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कॉँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजी कवठेकर यांचीही उपस्थिती होती.या सर्वांसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी जी झुंबड उडाली, ती पाहता अजूनही जनता आपल्या नेत्यांवर किती प्रेम करते, याची जाणीव यानिमित्ताने झाली. अनेक नेत्यांना अर्धा, पाऊण तास केवळ फोटोसेशनसाठी द्यावा लागला. ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांपासून ते कडेवर बाळ घेतलेल्या आईपर्यंत सर्वांनी आपल्या आवडत्या नेत्यांसमवेत फोटो काढून घेतले.