कोल्हापूर : ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपली गावे समृध्द झाली पाहिजेत. ती समृध्द झाली तरच गावाकडची ओढ वाढते. केवळ पोटाची भूक भागली म्हणजे विकास नव्हे तर मानसिक समाधानही महत्वाचे आहे. असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी ‘लोकमत’ ने आयोजित केलेला सरपंच अॅवार्ड उपक्रम ग्रामविकासाला बळ देणारा आहे असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.‘बी. के. टी. टायर्स प्रस्तूत ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळा शुक्रवारी कोल्हापूरात व्ही. टी. पाटील सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ होते. ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भालकर कला अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘गणेश वंदनाने पुरस्कार वितरर सोहळ्यास प्रारंभ झाला.मंत्री पाटील म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर ‘लोकमत’ ने नेहमीच कौतुकाची थाप मारली. विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते, त्यातूनच पोपरेवाडीच्या ‘राहीबाई’चे शेतीमधील काम संपुर्ण महाराष्ट्रासमोर आणले.
गेल्या दोन वर्षापासून सरपंच अवॉर्ड च्या माध्यमातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहीत केले. गावांत सगळ्या सुविधा मिळाल्या तर शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल. त्यादृष्टीने ग्रामपंचायतींनी वाटचाल ठेवावी. सरकारच्या वतीने अनेक योजना सुरू आहेत, पण योजना खेचून आणून प्रामाणिकपणे खर्च केला तर गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘लोकमत’ ने ग्रामपंचायती पासून संसदे पर्यंत चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम केल्याने धन्यवाद देतो. पुरस्कारांमुळे ग्रामपंचायतींमध्ये इर्षा व स्पर्धा वाढेल आणि त्यातून गावांचा विकास वेगाने होईल. चौदावा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना येतो, त्याचा विनियोग चांगला व्हायला पाहिजे. पण काही ठिकारी यावरून भांडणे होतात. ग्रामीण रस्ते चांगले नाहीत, अंतर्गत रस्ते चांगले नसल्याचे त्यांनी मंत्री पाटील यांना निदर्शनास आणून दिले.बीकेटी टायर्स अॅग्रो सेल्सचे राज्याचे प्रमुख जुबेर शेख म्हणाले, सरपंच अवॉर्डच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहचण्याची ‘लोकमत’ मुळे आम्हाला चांगली संधी मिळाली. बीकेटी जागतिक दर्जाची कंपनी असून १३० देशात निर्यात केली जाते. २७०० विविध श्रेणीमध्ये टायर बनविल्या जातात. व्यावसायिक टायर आम्ही बनवत नाही. एकूण उत्पन्नापैकी ३.७५ टक्के खर्च सामाजिक कामावर करतो. त्यातून दीड लाख महिला मोफत शिक्षण, दीड लाखांहून अधिक मुलांना दुपारची जेवण दिले जाते.‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड मागील भूमिका विशद केली. यावेळी ‘लोकमत’ चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘लोकमत’चे व्हाईस प्रेसिडंट (जाहीरात) अलोक श्रीवास्तव, राजेंद्र गंटे (तिरूपती टायर्स, गोकुळ शिरगाव), विजयराव मांगोरे (गोपाल टायर्स, मूरगूड), शशिकांत तेंडूलकर (तेंडूलकर टायर्स, कोल्हापूर), अशोक राजमाने (पार्श्व टायर्स, हालोंडी) आदी उपस्थित होते. मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी आभार मानले.यावेळी ‘सरपंच आॅफ दि इयर’ पुरस्काराने सांगरूळ (ता. करवीर)चे सरपंच सदाशिव खाडे, ‘उद्योन्मुख सरपंच’म्हणून सुभाष भोसले (पिराचीवाडी) यांच्यासह ‘जलव्यवस्थापन’ सागर माने (जाखले, पन्हाळा) , ‘वीज व्यवस्थापन’ वर्षा गायकवाड (आळवे, पन्हाळा), शैक्षणिक सुविधा (चेन्मेकुपी, गडहिग्लज), स्वच्छता ललिता बरगाले (नृसिंहवाडी), आरोग्य प्रकाश जाधव (पोर्ले, पन्हाळा), पायाभूत सेवा (विद्या संकेश्वरे, नांदणी), ग्रामरक्षण राजकुंवर पाटील (सरूड, शाहूवाडी), पर्यावरण संवर्धन अमरसिंह पाटील (तळसंदे, हातकणंगले), लोकसहभाग-ई लर्निंग उदय गीते (कबनूर, हातकणंगले), रोजगार निर्मिती रूपाली कांबळे (लोंघे, गगनबावडा), कृषी तंत्रज्ञान अशोक फराकटे (कसबा वाळवे, राधानगरी).