रत्नागिरी : पॉलिशचा बहाणा करीत महिलांकडील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. सोन्याचे दागिने कुकरमध्ये तापवून चकचकीत करण्याच्या नावाखाली या टोळीने नेवरे-मुरुगवाडीत शेजारी-शेजारी राहणाऱ्या चार घरांमध्ये हातसफाई केली. एकाचवेळी आलेल्या चार ते पाच गटांतील भामट्यांनी शंभर ग्रॅम वजनाचे अडीच लाख बाजारमूल्य असलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली . हा प्रकार काल, सोमवारी सायंकाळी घडला. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील अनेक गावांत या टोळीने धुमाकूळ घातला असून, दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील पूर्णगड येथेही एका ठिकाणी या भामट्यांनी दागिने लंपास केले आहेत. अन्य ठिकाणीही हे प्रकार घडले असून, पोलीस ठाण्यात त्याबाबत अद्यापही तक्रारी दाखल झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. काल, नेवरे गावातील मुरुगवाडीत काही गटाने आलेल्या या भामट्यांनी प्रथम तांब्या-पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू पॉलिश करून दिल्यानंतर त्यांच्याकडे सोन्याचे दागिनेही पॉलिश करण्यास दिले. त्यानंतर भामट्यांनी हे दागिने कुकरमध्ये पाण्यात टाकले. पाण्यात हळद व अन्य पदार्थ टाकण्याच्या नावाखाली घरच्यांना गुंतवून ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर दागिने चकचकीत होतील, तोपर्यंत वाट पाहा, असे सांगून ते निघून गेले. मात्र, नंतर कुकर उघडून पाहता त्यात दागिनेच नसल्याचे आढळले. चारजणांची फसवणूक होऊनही याबाबत आज, मंगळवारी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या एकाच व्यक्तीने तक्रार नोंदविली आहे. दीक्षा नागेश भारती (वय ३२, नेवरे, मुरुगवाडी) यांनी आपली ५० ग्रॅम वजनाची नवीन व जुनी अशी दोन मंगळसूत्र भामट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल केली.
पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास
By admin | Published: January 06, 2015 11:51 PM