लोकमत न्यूज नेटवर्क लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरीसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. या सोहळ्याची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाला असल्याने यावर्षी भाविकांमध्ये उत्साह आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. लोणंद शहरात पालखी सोहळा २८ व २९ रोजी मुक्कामी येत आहे. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण लोणंदनगरी दुमदुमली आहे.
पालखी सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी पोलीस, आरोग्य, नगरपंचायतीचे कर्मचारी, महावितरण व बांधकाम विभागाचे कर्मचारी दिवस रात्र कामात व्यस्त आहेत. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. याही वर्षी हा सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वच विभाग सज्ज झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी दुपारी एक वाजता माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर पाडेगाव हद्दीत जिल्हा परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात येईल. सायंकाळी चारपर्यंत पालखी सोहळा लोणंदच्या पालखीस्थळावर स्थिरावणार आहे. लोणंदनगरीमध्ये सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झाली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दत्त घाट निरा, लोणंद पालखी तळाची पाहणी करून वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वच विभागांनी एकमेकांशी समन्वय साधत लोणंद पोलिसांकडून माऊलींच्या दर्शन रांग तसेच पालखी काळात पार्किंग व्यवस्था व वाहतूक व्यवस्थे संबंधित नकाशे प्रसिद्ध केले आहेत. त्याचे ठिकठिकाणी फलकही लावले आहे.
लोणंदमध्ये पालखीचा मुक्काम असणाऱ्या दिवशी शहरातील रस्ते सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येतात. खंडाळ्याच्या दिशेने येणारी वाहतूक बिरोबावस्तीपर्यंतच असून, त्या ठिकाणी वाहन पार्क करून पायी शहरात यावे लागणार आहे. याचप्रमाणे साताऱ्याहून येणाऱ्यांनी गोटेमाळ येथे, शिरवळहून येणाऱ्यांनी चोपान वस्ती, निरेहून येणाऱ्यांनी निरा टोलनाका तर फलटणहून येणाऱ्यांनी कापडगाव येथे दुचाकी व चारचाकी पार्क करावी लागणार आहे.
असा असेल बंदोबस्त
१ अपर पोलीस अधीक्षक७ पोलीस उपअधीक्षक
१२ पोलीस निरीक्षक७६ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक
६१५ पोलीस जवान१७० महिला पोलीस
१६० वाहतूक पोलीस अंमलदार९४५ अंमलदार
९०० होमगार्ड१० महिला होमगार्ड
१ राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी२ जलद कृती दलाची कंपनी
२७लोणंद-पोलीस
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी लोणंदनगरीत येत आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पोलीस सज्ज झाले आहेत.