कोल्हापूर : आयकर विभागाच्या कामासाठी कोल्हापुरात आलेल्या राजापुरातील कॉन्ट्रॅक्टरने स्टेशन रोडवर पार्किंग केलेल्या मोटारीचे दरवाजे लॉक नसल्याचे पाहून चोरट्याने गाडीतील साडेतीन लाखांची रोकड व महत्त्वाच्या कागदपत्रांची सुटकेस हातोहात लंपास केली. आज, शनिवारी दुपारी दीड वाजता गजबजलेल्या स्टेशन रोडवर ही घटना घडल्याने पोलीसही चक्रावून गेले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, एम. त्रिपाल रेड्डी (वय ७०, रा. अनुस्कुराघाट पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, मूळ गाव, रामपुरम, आंध्र प्रदेश) हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते सकाळी आयकरच्या कामासाठी कोल्हापुरात आले होते. काम पूर्ण करून ते दुपारी दीडच्या सुमारास मोटारीचे टायर बदलण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. याठिकाणी एम. एम. टायर दुकानासमोर गाडी पार्किंग करून ते व चालक टायर घेण्यासाठी दुकानात गेले. यावेळी गाडीचे दरवाजे लॉक नसल्याचे पाहून चोरट्याने पाठीमागील शिटवर ठेवलेली ब्राऊन रंगाची सुटकेस घेऊन पोबारा केला. काही वेळाने ते गाडीजवळ आले असता सुटकेस गायब असल्याचे दिसले. त्यांनी गाडीमध्ये आजूबाजूला पाहिले, परंतु ती मिळून आली नाही. हा प्रकार दुकानदार व इतर व्यापाऱ्यांना समजताच त्यांनी गाडीजवळ गर्दी केली. सुटकेसमध्ये रोख साडेतीन लाख रुपये, बँकेचे धनादेश होते. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
साडेतीन लाख हातोहात लंपास
By admin | Published: January 04, 2015 1:17 AM