कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (केडीसीसी) दुरंगी लढत होणार हे निश्चित आहे. केवळ कोण-कोणाला बरोबर घेणार एवढीच औपचारिकता राहिली आहे. आज, शुक्रवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने माघारीसाठी झुंबड उडणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, पण हे अशक्य असल्याने किमान दोन्ही काँग्रेसने एकत्रित येऊन निवडणूक लढवावी, असा आमदार हसन मुश्रीफ यांचा प्रयत्न आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा केली आहे, पण राष्ट्रवादीने दिलेला फॉर्म्युला कसा मान्य होणार हे अवघड आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली, पण अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आज, शुक्रवारी पुन्हा चर्चा होणार आहेत. ‘गोकुळ’ निवडणुकीतील आघाड्या कायम राहणार हे मात्र निश्चित आहे. दरम्यान, गुरुवारी १३ जणांनी माघार घेतली असून यामध्ये अनिल यादव, पुंडलिक रावजी पाटील यांचा समावेश आहे. आतापर्यंत २० जणांनी माघार घेतली आहे. (प्रतिनिधी)
‘केडीसीसी’साठी दुरंगी लढत
By admin | Published: April 24, 2015 1:33 AM