कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याचा कायदा करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महसूल खात्याने त्वरित कायद्याचा मसुदा मंत्रिमंडळापुढे ठेवावा, या मागणीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी (जि. अहमदनगर) येथील घरावर लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा उमेश देशमुख यांनी आज, बुधवारी कोल्हापुरात केली.कोल्हापुरातून मंगळवार, दि. २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून लॉंग मार्च सुरू होणार आहे. लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मेळावे घेण्यात येणार असल्याचे किसान सभेचे जिल्हा सचिव अमोल नाईक यांनी सांगितले.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान शेतकऱ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. उदय नारकर होते. मेळाव्याला जिल्ह्यातील देवस्थान शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.किसान सभेने आयोजित केलेल्या नाशिक ते मुंबई लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री व विविध खात्यांच्या सचिवांशी झालेल्या चर्चेत हे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तसे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत करून नंतर तो शासनादेशही जारी केला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, यासाठी किसान सभेच्या वतीने अकोला (अहमदनगर) ते लोणी असा लॉंग मार्च २६ ते २८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांच्या घरावर २६ एप्रिलपासून लाँग मार्च, देवस्थान शेतकरी मेळाव्यात घोषणा
By विश्वास पाटील | Published: April 12, 2023 5:20 PM