मूळची कोल्हापूरची असलेली आणि वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ स्पिन गोलंदाजही आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. अष्टपैलू कामगिरी कामगिरी केलेल्या अनुजा पाटील यांची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या यशाबद्दल लोकमतने त्यांना बोलते केले.सचिन यादवकोल्हापूर : दीर्घकालीन अनुभवामुळे स्पर्धेत विजयाची खात्री आहे. सामन्यात सांघिक कौशल्य दिसेल. महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात यंगस्टार आणि वरिष्ठ महिला असा मिलाफ आहे. कर्णधारपदामुळे माझ्या सहकाऱ्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. जे सांघिक खेळात खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे माझ्या नेतृत्व कौशल्यात आणि माझ्या खेळातही कमालीची सुधारणा झाली. दिल्ली येथे होत असलेल्या स्पर्धेतही विजयश्री खेचून आणू, असा विश्वास महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार अनुजा पाटील यांनी व्यक्त केला .
कर्णधारपदाची भूमिका काय असते?कर्णधार हा खूप महत्त्वाचा आणि वैयक्तिकरित्या सर्वांना बरोबर घेवून जाणारा असतो. या जबाबदारीने माझ्या कारकीर्दीला आकार देण्यास खूप मदत केली. ते सामन्याची तयारी, तंत्र सुधारणा आणि खेळापूर्वी खेळाडूची मानसिकता तयार करण्याचे तंत्र माझ्या प्रशिक्षकांकडून शिकले. त्यांनी दिलेल्या अनुभवाचा करिअरमध्ये फायदा होत आहे. प्रतिभा स्वतःमध्ये असते परंतु प्रशिक्षक ती कौशल्ये अधिक धारदार करण्यास मदत करतो.
क्रिकेट खेळणाऱ्या तरुण मुलींसाठी काय संदेशसध्याच्या काळात जग बदलले आहे. मुली सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. अनेक ठिकाणी अकॅडमीमध्ये सुविधा चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. मात्र त्यासह कठोर परिश्रम करणे, लक्ष केंद्रित करणे, सुविधांचा सुज्ञपणे वापर करणे आणि फिटनेसवर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
क्रिकेटमध्ये करिअर आहे काखेळाडूंना आता पूर्वीपेक्षा वेगळी ओळख, मान्यता आणि करार मिळत आहेत. भारतात महिला क्रिकेट बदलत आहे. लोक महिला क्रिकेट मध्ये अधिक रस घेत आहेत. शहरासह, ग्रामीण भाग, गल्लोगल्ली तरुण मुलीही क्रिकेट खेळू लागल्या आहेत. पालक त्यांच्या मुलींना करिअरचा पर्याय म्हणून क्रिकेटकडे पाहत असल्याने त्यांना अधिक पाठिंबा मिळत आहे.
कोणत्या संघासोबत सामने होणार आहेतदिल्ली येथे एकदिवशीय स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र, सौराष्ट्र, हरियाणा , विदर्भ, उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाब या संघात ६ सामने होतील. या स्पर्धेत सौराष्ट्रासोबत झालेल्या पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने विजयी सलामी दिली आहे.
संघाला काय तंत्र दिलेएखाद्याची ताकद आणि संघाच्या गरजा जाणून घेतल्याने या फॉरमॅटमध्ये मदत होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करते. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे संघाच्या त्या अतिरिक्त धावा वाचवल्या जातात. ज्या खूप पुढे जातात आणि गोलंदाजांनाही मदत करतात.