कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेत ठेवलेलं पहिलं पाऊल तो दिवस व एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून शेवटी दीक्षान्त समारंभात मिळणाऱ्या पदवीचा दिवस, असे दोन दिवस अविस्मरणीय राहतात. हाच क्षण आयुष्यात जपून ठेवण्यासाठी विद्यापीठ परिसरात मोबाईलवर ‘सेल्फी’ फोटो काढून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती, असे काहीसे चित्र दीक्षान्त समारंभात आज, गुरुवारी पाहण्यास मिळाले. पदवी घेतल्यानंतर अंगात कोट आणि हातात पदवी प्रमाणपत्र घेऊन फोटोसाठी दिलेली पोझ घेऊन, जड पावलांनी एकमेकांना भेटण्याची आश्वासने देऊन विद्यार्थी सायंकाळी घरी परतले. दीक्षान्त समारंभाला येण्यासाठी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, के.एम.टी. व रिक्षा स्टॉपवर सकाळपासूनच गर्दी झाली होती. त्यामुळे विद्यार्थी, त्यांचे मित्र, मैत्रीण व पालकांनी विद्यापीठाचा परिसर फुलला होता. अनेक विद्यार्थी मुख्य इमारत, ग्रंथालयासह मानव्यशास्त्र विभाग येथे मित्र-मैत्रिणींची वाट पाहत जागोजागी थांबले होते. काही पालक आनंदाने आपल्या मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा पदवी समारंभ पाहण्यासाठी खास गाडी करून उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘सेल्फी’साठी लगबग...
By admin | Published: January 29, 2015 10:54 PM