कागल : पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. श्रमिक-कामगार वर्ग हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. या वर्गाच्या श्रमांना, कष्टांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. त्यांना नोकरीमध्ये सुरक्षा मिळायला पाहिजे, या विचारातूनच मी कामगारमंत्री या नात्याने क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. कामगारांच्या हरएक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी तत्पर असून, कष्टकरी-कामगारांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल विधानसभा मतदारसंघातील कामगारांचा मेळावा येथील अलका शेती फार्मजवळ आज, रविवारी आयोजित केला होता. तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक रणजितसिंह पाटील होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा बँक, साखर कारखाने, विविध संस्था, कंपन्या ओद्योगिक वसाहतीमधून हजारो व्यक्तींना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. गडहिंग्लज साखर कारखाना बंद पडला होता. तो चालू करून तेथील कामगारांना आधार दिला आहे. कष्टकरी वर्गाचे जीवनमान फुलविले आहे. बांधकाम कामगारांसाठी अडीच कोटींचे कल्याणकारी मंडळ बनविले आहे. कामगार वर्गाकडे कोणता गट-तट म्हणून न बघता त्यांना मदत केली आहे. यापुढेही माझ्या मतदारसंघातील एकही युवक बेरोजगार राहणार नाही, हाच माझा अजेंडा असेल.रणजितसिंह पाटील म्हणाले की, काल महिलांची प्रचंड गर्दी, तर आज कामगारांची गर्दी हीच मुश्रीफ यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. मेळाव्यातील ही गर्दी बघून विरोधकही आता फॉर्म भरायचा का नाही, याचा विचार करीत असतील. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी मुद्दाच राहिलेला नाही. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे जातीयवादाचा आधार घेत आहेत. यामुळे मुश्रीफ यांच्यावर प्रेम करणारी जनता अधिकच पेटून उठत आहे. नवीद मुश्रीफ यांनी स्वागत, तर भैया माने यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब स्वामी, दिलीप शिंदे, तुषार भास्कर, जितेंद्र लोकरे, विनायक चव्हाण, कुंडलिक खोडवे, कॉ. अशोक चौगुले, डी. डी. चौगले, सूर्यकांत पाटील, आदींचे मनोगत झाले. कृष्णात पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कामगारांच्या प्रत्येक प्रश्नावर तत्पर
By admin | Published: September 22, 2014 1:09 AM