कोल्हापूर : शहरासह उपनगरांत महिन्याभरात दहा ते पंधरा घरफोड्या झाल्याने पोलिसांची झोपच उडाली आहे. निष्क्रिय पोलिसांना अद्याप एकाही घरफोडीचा शोध लावता आलेला नाही. त्यामुळे नागरिकांतून पोलीस प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बंद घराला किंवा फ्लॅटला कुलूप दिसले की ते रात्रीत फोडले म्हणून समजा. शहरात नागाळा पार्क, मोरेवाडी, कदमवाडी, कसबा बावडा, आदी ठिकाणी महिन्याभरात सुमारे दहा ते पंधरा घरफोड्या झाल्या. रात्रीसह दिवसाढवळ्या घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता तपास सुरू आहे, एवढेच सांगितले जाते. कोणत्या पातळीवर तपास सुरू आहे, हे कळत नसल्याने तक्रारदार हतबल झाले आहेत. नागाळा पार्क येथे विश्वास दिवे यांचा भरदिवसा चोरट्यांनी फ्लॅट फोडून नऊ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख रुपये लंपास केले. ही जबरी चोरी दाखल होऊनही अद्याप त्याबाबतीत कोणतेच धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. मोरेवाडी येथे एका रात्रीत पाच घरे फोडून चोरट्यांनी पोलीस किती निष्क्रिय आहेत याचा दाखला दिला. घरफोडी करणार्या दरोडेखोर व चोरट्यांचा लवकरात लवकर माग काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
दिसले कुलूप की, फोडले घर
By admin | Published: May 25, 2014 1:08 AM