कोल्हापूर : महापालिकेतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस - शिवसेना आणि ताराराणी आघाडी - भाजप नगरसेवकांत गेल्या चार वर्षांपासून असलेली एकजूट विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता धूसर आहे.
नगरसेवकांवरील पक्षनेतृत्वाचे सुटलेले नियंत्रण, मागच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानंतरही कारवाई करण्यात आलेले अपयश यांमुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक नगरसेवक आपली स्वतंत्र भूमिका ठरविण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना यांची आघाडी सत्तेत आहे, तर ताराराणी-भाजप विरोधात आहेत. गेल्या चार वर्षांत सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत कमालीची चुरस तसेच एकजूट दिसून आली. भाजपबरोबर शिवसेनेची राज्यात युती झाली तेव्हा महापालिकेत महापौरपदाची निवडणूक लागली होती.
त्यावेळी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी भाजपकडून महापौरपदाच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा म्हणून बरेच प्रयत्न झाले. तेव्हा शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉँग्रेससोबत राहून एकजुटीचे प्रदर्शन घडविले.सगळ्यांत मोठी गोची ताराराणी आघाडीची झाली आहे. आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी मागची निवडणूक राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात लढविली होती; तर आघाडीच्या नेत्यांचे आमदार सतेज पाटील म्हणजेच कॉँग्रेसबरोबर राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘उत्तर’मधून कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. म्हणूनच ‘ताराराणी’च्या सर्व नगरसेवकांना ‘आधी दक्षिणचं बघा, मग उत्तरकडे बघूया’ असे निरोप देण्यात आले आहेत. उत्तरेत कोणाला मदत करायची, याचा निर्णय आघाडीने प्रलंबित ठेवला आहे.भाजपच्या नगरसेवकांतील एकजूट यावेळी मोडकळीस येण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना युती झाली असली तरी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भूमिका घेऊन त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. महापौर निवडणुकीतही त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे आता आम्ही का त्यांचा प्रचार करायचा? असे म्हणत भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीही हीच अवस्था आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा कॉँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीवरच आक्षेप आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा सगळ्या शहरभर त्यांचे डिजिटल फलक लावण्यात जाधवच आघाडीवर होते.
गेली चार वर्षे भाजपचे कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्या आणि घरात दोन नगरसेवक असलेल्या जाधवांसाठी आम्ही मते कशी मागायची, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी उत्तरेत शिवसेनेचा तर दक्षिणेत भाजपचा प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे निवडणूक १० दिवसांवर येऊन ठेपली असतानाही नगरसेवक प्रचारापासून अलिप्त असल्याचे पाहायला मिळत आहे. कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे १४, ताराराणी आघाडीचे १९, भाजपचे १४, तर शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत.