आयुष्यात प्रत्येकाला जगभरच काय, भारतातसुद्धा फिरता येईलच असे नाही. ‘चित्रपट’ हे एकमेव असे सशक्त माध्यम आहे, जे आपल्याला बसल्या ठिकाणी जगाची सफर घडवून आणते. त्यामुळे ‘चित्रपट महोत्सव’ ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, असे त्याचे वर्णन केले जाते. गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापूरकरांना ही सफर घडविणाऱ्या ‘कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला गुरुवारपासून शाहू स्मारक भवन येथे प्रारंभ झाला. यानिमित्ताने महोत्सवाचे संचालक दिलीप बापट यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : चित्रपट महोत्सव कोल्हापुरात आयोजित करण्यामागील भूमिका काय होती?उत्तर : कोल्हापूर ही चित्रपटसृष्टीची जननी आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पहिली चित्रपट कंपनी कोल्हापुरात सुरू केली, सिनेमाच्या पोस्टर पेंटिंगचे जनक तेच. पहिला भारतीय बनावटीचा कॅमेरा त्यांनी बनविला. त्यांच्या ‘सैरंध्री’ चित्रपटापासून सेन्सॉरशिप सुरू झाली. देशातील पहिले सुपरस्टार मा. विठ्ठल हे कोल्हापूरचेच. पहिला युद्धपट कोल्हापुरात बनला. प्रभात फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात झाली. कितीतरी दिग्गज कलावंत, निर्माते, दिग्दर्शक या शहराने दिले. चित्रपट कोल्हापूरच्या मातीत भिनला आहे. चित्रपट महोत्सवासाठीचे पोषक वातावरण कोल्हापुरात आहे, म्हणून महोत्सवाची संकल्पना पुढे आली. प्रश्न : चित्रपट महोत्सवाचे गेल्या नऊ वर्षांतील फलित काय?उत्तर : आम्ही २००९ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविला. नंतर ‘एशियन आय’ चित्रपट महोत्सव सुरू केला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त २०१२ साली या महोत्सवाचे ‘कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ असे नामकरण करण्यात आले. गेली पाच वर्षे हा महोत्सव ‘किफ्फ’ या नावाने देशभरात ओळखला जात आहे. महोत्सवात सुरुवातीला प्रेक्षकांना अन्य भाषांतील चित्रपट पाहताना चित्र बघायचे की सबटायटल्स वाचायची हेच कळायचे नाही. चित्रपट समजून घेताना अडचण यायची. आता मात्र असे होत नाही. सबटायटल्ससह चित्रपट पाहणारा रसिक तयार झाला आहे. जगभरातील चित्रपटांतून तेथील भाषा, संस्कृती, जीवनमान, संघर्ष, प्रश्न आणि त्यांवर त्यांनी शोधलेली उत्तरे हे सगळे पाहायला मिळते. दरवर्षी भरणारा ‘किफ्फ’ हा आता कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रश्न : महोत्सवातील चित्रपटांची निवड कशी होते?उत्तर : ‘डायरेक्टोरेट आॅफ फिल्म फेस्टिव्हल’ ही संस्था ‘इफ्फी’चे नियोजन करते. ‘किफ्फ’साठी त्यांच्याकडून देशभरातील निवडक चित्रपट पाठविले जातात. देशातील विविध राज्यांतील दर्जेदार सिनेमे इंडियन पॅनोरमाच्या माध्यमातून मिळतात. त्याला आपण ‘किफ्फ’मध्ये ‘विविध भारती’ हे नाव दिले आहे. ‘फिल्म डिव्हिजन’ या संस्थेकडून दर दोन वर्षांतून एकदा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविला जातो. त्यातील पुरस्कारप्राप्त चित्रपटदेखील ‘किफ्फ’साठी येतात. तसेच विविध देशांच्या सचिवालयांकडून चित्रपट मिळतात. अशा रीतीने चित्रपटसृष्टीशी निगडित केंद्र शासनाच्या विविध संस्थांकडून निवडक चित्रपट महोत्सवासाठी पाठविले जातात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्यावतीने चित्रपट प्रदर्शनातील विषय निवडले जातात आणि त्यासाठीची सर्व छायाचित्रे, पोस्टर्सदेखील पाठविली जातात. प्रश्न : यंदाच्या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य काय?उत्तर : भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त यंदाच्या महोत्सवात देशभक्तीवर आधारित सात चित्रपट आणि पाच माहितीपट दाखविले जाणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिनिमित्त ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अंतर्गत प्रत्येक राज्यातील तीन चित्रपट अन्य महोत्सवांसाठी पाठविले जात आहेत. ‘किफ्फ’मध्ये ओरिसातील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ‘कंट्री फोकस’मध्ये इराण या देशाची निवड करण्यात आली आहे. माय मराठी विभागात प्रदर्शित न झालेले सात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यांतून विजेत्या चित्रपटांची निवड करण्यात येणार आहे. अशा रीतीने आठ दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात ५०हून अधिक चित्रपट आणि तितकेच लघुपट दाखविले जाणार आहेत. तसेच या क्षेत्रातील विविध मान्यवरांशी थेट संवाद करता यईल. प्रश्न : चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना काय आवाहन कराल?उत्तर : कोल्हापूरचा माणूस चित्रपटांचा भोक्ता आहे. त्यांना दर्जेदार सिनेमे पाहायला आवडतात. आता टीव्हीवर सहजपणे चित्रपट पाहता येत असतील तरीही महोत्सवातील चित्रपट म्हणजे जगभरातील दर्जेदार चित्रपटांचे संकलन असते. ते एकत्रितरीत्या सहजासहजी पाहायला मिळत नाहीत. ते चित्रपट पाहण्याची, अनुभवण्याची, देश-विदेशांतील संस्कृती, प्रश्न अनुभवण्याची संधी किफ्फच्या माध्यमातून दिली जाते. तिचा आस्वाद अधिकाधिक रसिकांनी घ्यावा, हेच महत्त्वाचे आवाहन आहे; कारण कोणत्याही चळवळीच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग हवाच असतो.- इंदुमती गणेश
जगाकडे पाहा चित्रपट महोत्सवाच्या खिडकीतून...
By admin | Published: December 22, 2016 11:53 PM