- चंद्रकांत कित्तुरे-
जगभर पितृदिन साजरा होत असतानाच रविवारी एक बातमी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मालमत्ता नावावर करीत नाहीत म्हणून एका मुलाने आपली आई आणि वडिलांना नारळपाण्यातून विष दिल्याची ती बातमी होती. यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आईने प्रसंगावधान राखल्याने तिचा जीव वाचला. ज्याला जन्म दिला, हाडाची काडं करून वाढविला, शिकविला, संसाराला लावला त्यानंच आई-बापाच्या जिवावर उठावं याला काय म्हणावं ? श्रावणबाळाचा वारसा सांगणारा आपला देश, संस्कृती; जिथे नातेसंबंधांना खूप महत्त्व दिलं जातं. मुळात नातेसंबंध म्हणजे काय? रक्ताची नाती म्हणजे पै-पाहुणे, भावकी, आदी नातेवाईक मंडळी. यात काही दूरची तर काही जवळचीही नाती असतात. याशिवाय जोडलेली नातीही जीवनात फार महत्त्वाची असतात. बऱ्याचवेळा रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नातीच अधिक उपयोगी पडतात. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. आता ‘हम दो हमारे दो किंवा एक’चा जमाना आहे. यामुळे एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन विभक्त कुटुंबपद्धतीला महत्त्व आले आहे. लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींना काही दिवसांतच सासू-सासरे, दीर, नणंद ही पतीच्या जवळची माणसे घरात नकोशी वाटू लागतात. यावरून घरात भांडणे सुरू होतात. वेगळं राहाण्याचा लकडा पतीच्या मागे लावला जातो. दररोजच्या कटकटीला कंटाळून पती विभक्त राहण्याचा निर्णय घेतो किंवा तुमचं तुम्ही वेगळं राहा, असं आई-वडीलच सांगून टाकतात. असं सांगताना त्या जन्मदात्यांना काय वेदना होत असतील, हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे. याचवेळी आपण सासरी जशा वागतो तसे आपल्या भावाच्या बायकोने आपल्या आई-वडिलांसोबत वागू नये, असेही या महिलांना वाटत असते. पण घरोघरी मातीच्याच चुली. या उक्तीप्रमाणे प्रत्येक घरात कमी अधिक फरकाने सारखीच परिस्थिती असते. यामुळेच आजकाल एकत्र कुटुंबे शोधावी लागतात. वृद्धाश्रमांची वाढती संख्या देखील हेच दर्शविते. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे बºयाचवेळा त्यांची विचारपूस करायलाही येत नाहीत. यामुळे वारसदार असूनही बेवारसाची जिंदगी वाट्याला आल्यासारखे त्यांना जगावे लागते. मृत्यूनंतर मृतदेह ताब्यात घ्यायला न येता तुम्हीच अंत्यविधी उरकून घ्या, असे वृद्धाश्रमचालकांना सांगणारे काही महाभागही असल्याचे वृद्धाश्रमचालकांशी चर्चा करताना जाणवते. एकलकोंडेपणाचे जीवन वाट्याला आलेले हे माता-पिता कधीतरी माझे बाळ येईल आणि मला आपल्या घराकडे घेऊन जाईल, या आशेवर कसेतरी दिवस ढकलत असते.‘मातृ देवो भव! पितृ देवो भव!’ असे म्हणणारा भारतीय समाज तो हाच का, असा प्रश्न हे पाहून पडतो. वाढती महागाई, बदलती जीवनशैली, पाश्चात्यांचे अंधानुकरण, वाढती महत्त्वाकांक्षा यासारख्या कारणामुळे समाज असा बदलत चालला आहे. यामुळेच नात्यातील मायेचा, प्रेमाचा ओलावा कमी होत चालला आहे. याला अपवाद असणारी मुले-मुली, आई-वडील, कुटुंबे आहेत; नाही असे नाही, पण त्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे दिसते. कोणतंही नातं विश्वासावर अवलंबून असतं; टिकून असतं. पण आजच्या स्वार्थी जमान्यात हा विश्वासही हरवू लागला आहे. यामुळेच की काय माणूस नातीही विसरू लागला आहे की काय, असे वाटण्याजोग्या बातम्या ऐकायला, वाचायला मिळतात. पती-पत्नी, भाऊ- बहीण, बाप-लेक, दीर-भावजय, यासारख्या नात्यांचं पावित्र्यही राखलं जाताना दिसत नाही, असे वाटते. जनावरेसुद्धा निसर्गनियम पाळतात. मात्र माणसे तो मोडतात, आणि अनिर्बंध जगू लागतात. त्यावेळी ती हैवान बनतात. अशा हैवानांना शासन करून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच टाकायला हवा. त्याचवेळी रक्ताची असोत वा जोडलेली नाती, टिकविली पाहिजेत; जपली पाहिजेत.वृद्ध माता- पित्यांच्या बाबतीत तर आपण अधिक जागरुक रहायला हवे. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असते, असे म्हणतात. याची जाणीव ठेऊन त्यांना जपायला हवे. त्यांची काळजी घ्यायला हवी, त्याचवेळी ‘मातृ देवो भव! पितृ देवो भव!’ या उक्तीला आपण जागलो असे म्हणता येईल.
(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.-kollokmatpratisad@gmail.com)