: सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : देशातील सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय असतानाही राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच वीजदरात एक रुपया व व्याजामध्ये पाच टक्के सवलतीचा लाभ मिळत नसल्याने यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील यंत्रमाग संक्रमण अवस्थेतून जात असल्याने या उद्योगाला सावरण्यासाठी वीज दरात एक रुपयाची व व्याजामध्ये पाच टक्के सवलत देण्याची घोषणा तत्कालीन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. तसेच विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने सवलत देणे गरजेचे आहे. तसेच दोन हजार ३०० प्रकरणे पाच टक्के व्याजासाठी मुंबईला पाठवून दिल्याचे सांगितले. त्यावर कार्यवाही केली नाही. वस्त्रोद्योगाशी संबंधित कामे कोणाकडूनही केली जात नाहीत. समाजातील अनेक घटकांना कोरोना काळातील मोबदला मिळाला आहे. परंतु, सरकारने यंत्रमाग कामगारांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. त्यामुळे संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत यंत्रमाग व्यवसाय सुरळीतपणे सुरू होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असे आमदार आवाडे म्हणाले.