हातकणंगले : तालुक्यातील सोयाबीन आणि भाजीपाला व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीचा सेस भरला नाही, वजन-काटे सदोष आहेत, याबद्दल वडगाव मार्केट कमिटीच्या प्रशासनाने हातकणंगले पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अशा व्यापाऱ्यांना फैलावर घेताच राजकीय हस्तक्षेपामुळे बाजार समितीलाच माघार घ्यावी लागली. यामुळे शेतकरी व इतर सर्वसामान्य यांची लूट होत आहे.अत्यल्प पावसाचा खरीप पीक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. एकरी चार-सहा पोती सोयाबीन उतारा पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचा खर्चही भागत नाही, अशी परिस्थिती असताना व्यापाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांच्या मालाला मातीमोलाचा भाव दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये आर्द्रता, मातीचे प्रमाण जास्त आहे, अशी कारणे देवून सोयाबीन दर पाडले जात आहेत. सोयाबीनची घटनावळ, कटणावळ शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी वडगाव बाजार समिती प्रशासनाकडे केल्यानंतर समितीकडून तालुक्यातील शिरोली, हेर्ले, सावर्डे, आळते, हातकणंगले, रुकडी यासह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्याविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने हस्तक्षेप केल्याने व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई टळली आहे. तर या राष्ट्रवादीच्या नेत्याने मार्केट कमिटी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत केली होती. यामुळे मार्केट कमिटी प्रशासनाने तक्रार मागे घेतली आणि व्यापाऱ्यांना रान मोकळे झाले .मार्केट कमिटी प्रशासनाच्या या गळचेपी धोरणामुळे व्यापाऱ्याचे फावणार आहे, तर शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. व्यापाऱ्यांची वजन काटे तपासणी कोण करणार, त्याची वैधता कोण तपासणी करणार आणि शेतकऱ्याच्या मालाची आर्द्रता वैध आहे का, याची पडताळणी कोण करणार, आर्द्रता मशीन योग्य आहेत का, याची चौकशी कोण करणार, हे सर्वच प्रश्न अनुत्तरीत ठरत आहेत. या प्रकरणाबाबतीत मार्केट कमिटीचे ज्येष्ठ संचालक नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सेस भरत नाहीत अशा व्यापाऱ्यांविरुद्ध मार्केट कमिटीने कडक धोरण स्वीकारले आहे. सेस भरून घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे, असे मत व्यक्त केले.
वडगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट
By admin | Published: October 05, 2015 12:33 AM