कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि महाद्वार परिसरातील रस्ते महापालिकेचे आणि त्या कडेला बसून व्यापार करणाऱ्यांकडून पैसे दुकानदार गोळा करीत आहेत. जागेचे अंतर आणि विक्रेत्याची दिवसभरातील उलाढालीनुसार दिवसाला १०० ते ७०० रुपयांपर्यंतचे भाडे मूळ दुकानदार घेत आहेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जागा मिळेल तिथे बसून ते पोट, पाणी चालवतात. मात्र, त्यांच्याकडूनच जवळचे दुकानदार मनमानी पद्धतीने पैशाची वसुली करीत आहेत. परिणामी फेरीवाले, छोट्या विक्रेत्यांची लूट सुरू आहे.शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार शहरात फिरून किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी बसून व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. या धोरणानुसार महापालिकेने फेरीवाले झोन तयार करणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडे असे झोन तयार केलेले नाहीत. परिणामी फेरीवाले, छोटे विक्रेते शहराच्या मध्यवस्तीत वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी व्यवसाय करतात.शहरातील महाद्वार रोडवर सर्वाधिक फेरीवाले आणि दोन्ही बाजूला बसून व्यवसाय करणारे आहेत. सर्वच दुकानांसमोर रस्त्याकडेला ते बसून, थांबून विविध जीवनावश्यक वस्तू विकत असतात. त्यांच्याकडून दुकानदार रोज पैसे वसूल करीत आहेत. पैसे देण्यास नकार दिला तर दमदाटी केली जात आहे. यामुळे हातावर पोट असणारे छोटे विक्रेते त्यांना भाडे म्हणून पैसे देत आहेत. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक, पर्यटक खरेदीसाठी महाद्वार रोडला येत असल्याने तिथे रस्त्याकडेला सर्वाधिक विक्रेते दिसतात. ते पैसे दिले तर त्यांना अभय देतात नाही दिले तर हाकलून लावतात. म्हणून रस्ता महापालिकेचा असतानाही दुकानदारांना पैसे का द्यायचे, असा प्रश्न विक्रेत्यांना सतावत आहे.
दुचाकी पार्किंगला जागा नसते..महाद्वार रोडवर दोन्ही बाजूस विक्रेत्यांचा विळखा प्रचंड वाढल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दुचाकी लावण्यास जागा मिळत नाही. रस्त्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, असे काही दुकानदार दुकाने थाटतात. या रोडवर वांरवार वाहतुकीची कोंडी होत आहे.