जहॉगीर शेखकागल : येथील महाराष्ट्र शासनाचा सीमा तपासणी नाका अदानी समुहाकडे चालविण्यास दिला आहे. हे खासगीकरण रद्द करा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनच्यावतीने मालवाहतूक ट्रकसह नाक्यावर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काळे ध्वज फडकावीत जोरदार घोषणा दिल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशातील सर्व टोल नाके व तपासणी नाके बंद करण्याचे धोरण सांगत असताना कागल चेक पोस्टचे खासगीकरण केले गेले आहे. खासगीकरणातून हा तपासणी नाका कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही. गुजरातहुन येणारी आणि दक्षिणेत जाणारी सर्व मालवाहतूक कागलच्या नव्या नाक्यावर रोखुन धरू. कोल्हापुरातून आयआरबी कंपनीला जसे हाकलून लावले तसे या खासगी कंपनीला देखील हाकलून लावू असा इशारा जिल्हा अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला.कागल तालुका अध्यक्ष मल्हारी पाटील म्हणाले की, तपासणी नाक्यांचे खासगीकरण करण्याची ही सुरवात महाराष्ट्रातच केली जात आहे. गुजरातमध्ये अजुन सुरू नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. आता गुजराती कंपन्यांना सरकारी तपासणी नाका चालविण्यास दिले जात आहेत. हे खासगीकरण रद्द करावे अन्यथा कागल तालुक्यातील जनता आंदोलन करेल.यावेळी कंपनीचे व्यवस्थापक सुनिल पवार आणि निलेश भोसले यांनी निवेदन स्विकारले तसेच आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब घोंगळे, प्रकाश केसरकर, हेमंत डिचले, संजय चितारी, शिरीष बारवाडे, बाळासाहेब कलशेट्टी, महेश पाटील, अरूण जाधव आदी प्रमुख उपस्थितीत होते.
आयआरबी कंपनीसारखं हाकलून लावू; कागल येथील सीमा तपासणी नाक्याविरोधात लॉरी असोसिएशनचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 5:30 PM