कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे (ता.पन्हाळा) व मांगले (ता. शिराळा) दरम्यान वारणा नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचे काम ठप्प झाल्याने वीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा काखेचे सरपंच दगडू पाटील यांनी केला.
२० शेतकऱ्यांची मांगले हद्दीत ४० एकरांवर शेती आहे. येथील शेतकऱ्यांना काखेतून मांगले हद्दीत शेती करण्यासाठी एक दोन कि.मी. अंतर आहे. तथापि जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम गतवर्षीपासून सुरू आहे. या शेतकऱ्यांना मोहरे, सातवे, बच्चे सावर्डे मांगले किंवा कोडोली, चिकुर्डे, ठाणापुडे, मांगले या दोन मार्गांवरून जाण्यास पंधरा ते वीस कि.मी. अंतर जावे लागत आहे. याचा शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे, असे सरपंच दगडू पाटील सांगितले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सप्टेंबर २०२० मध्ये या पुलाच्या बांधकामास बालाजी कन्ट्रक्शन, संगमनेर या कंपनीने प्रारंभ केला व सहा महिन्यांमध्ये पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येणार असल्याचे ठेकेदार व बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, अंतिम टप्प्यात आलेल्या नवीन पुलाचे काम अचानक महिन्यापासून बंद केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
फोटो ओळ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या काखे - मांगले पुलाचे अर्धवट असलेले काम.