कोल्हापूर : राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.आजरा येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. २१) पुण्यात केली होती, तिला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. त्यांनी दहा ते बारा लोकसभेच्या व तेवढ्याच वेळा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.
देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. याचे भान त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ठेवावे. चंद्रकांत पाटील यांना पाच वर्षे चांगली संधी मिळाली होती; मात्र त्यांनी काहीही केले नाही. राज्याला सोडाच; कोल्हापूरलाही त्यांचा काहीही उपयोग झाला नाही.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी तांबेकर यांनी स्वागत केले. आजराचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी प्रास्ताविक केले.पैसे घेऊन जाणारे आमचे उमेदवार नव्हेत.मेळाव्यापूर्वी मंत्री मुश्रीफ हे जनता बँकेत बसले असता, एका शेतकऱ्याने हातात पैसे भरल्याची पावती घेऊन विचारले,हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले उमेदवार आलेत का? यावर ते आमचे उमेदवार नव्हेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्या उमेदवाराची मात्र तालुक्यात जोरदार चर्चा झाली.