कोल्हापूर : शहरातील घरफाळा थकबाकीदारांसाठी महापालिकेकडून दंडव्याजात सवलत योजना आणली आहे. तीन टप्प्यांमध्ये सवलत असल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी घरफाळा १०० टक्के वसूल होण्यासाठी दंडव्याजात सवलत योजना सुरू करण्याच्या सूचना सोमवारी केली. यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री पाटील यांनी सवलत योजनेची माहिती संबंधित मिळकतधारकांना मोबाईल एसएमएसद्वारे देण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, घरफाळा दंड व्याजावरील सलवत योजनेत ज्या रकमेची सवलत देणार आहे. ती रक्कम किती असेल, याची माहिती संबंधित थकबाकीदाराला मोबाईलवरुन एसएमएसद्वारे कळवा. यामध्ये थकबाकी रककम किती, त्यावरील दंड व्याज किती आणि त्यांना मिळणारी सवलत किती या माहितीचा समावेश असावा. यामुळे थकीत घरफाळा जमा होऊन महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.
चौकट
एक हजार चौरस फुटाच्या आतील मिळकतधारकासाठी योजना
३१ जानेवारीपर्यंत : दंड व्याजात ७० टक्के सवलत
२८ फेब्रुवारीपर्यंत : दंड व्याजात ६० टक्के सवलत
३१ मार्चपर्यंत : दंड व्याजात ५० टक्के सवलत
चौकट
एक हजार चौरस फुटांवरील मिळकतधारकांसाठी सवलत
३१ जानेवारीपर्यंत : दंड व्याजात ५० टक्के सवलत
२८ फेब्रुवारीपर्यंत : दंड व्याजात ४० टक्के सवलत
३१ मार्चपर्यंत : दंड व्याजात ३० टक्के सवलत
चौकट
सवलत योजनेची अंमलबजावणी या महिन्यापासूनच केली जाणार आहे. व्यापारी मिळकतीवरील थकबाकीदारांच्या दंडव्याजावरील सवलतीबाबत पुढील काही दिवसात निर्णय घेतला जाईल. दंड व्याजावरील माफी ही येथून पुढे दिली जाणार नाही. यावर्षी ही शेवटची संधी आहे.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोल्हापूर महापालिका