कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हॅट्रीकला लगाम घालत कॉँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी पहिल्याच दणक्यात विजयी गोलची नोंद करीत ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये तब्बल दहा वर्षांनी कॉँग्रेसचा झेंडा फडकावला. शिवसेनेत क्षीरसागर यांच्याबद्दल असलेल्या असंतोषाचा फायदा उठवत आणि कॉँग्रेस - राष्टÑवादीची मोट बांधत चंद्रकांत जाधव यांनी १५ हजार १९९ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. जाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळाल्यापासून केवळ १३ दिवसात आमदार होण्याचा मान मिळाला.
कोल्हापूर उत्तर मतदार संघात झालेल्या १ लाख ७५ हजार ३२५ मतदानापैकी चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ०५३ तर राजेश क्षीरसारग यांना ७५ हजार ८५४ इतक ी मते मिळाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतिशचंद्र कांबळे (१४८३ मते), वंचित आघाडीच्या राहूल राजहंश (११५४ मते) यांचा या निवडणुकीत दारुण पराभव होऊन डिपॉझिट सुध्दा जप्त झाली.
मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासून चंद्रकांत जाधव आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना ३९०० चे मताधिक्य मिळाले. तेथून त्यांच्या विजयाची घोडदौड सुरु झाली. नवव्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य १२ हजाराच्या पुढे गेले आणि त्याचवेळी त्यांच्या विजयाची खात्री झाली. प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले.
जाधव यांना मतदार संघातील कसबा बावडा, लाईनबाजार, सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, जाधववाडी, रुईकर कॉलनी, ताराबाई पार्क, शाहूपुरी, महाराणा प्रतापचौक, अकबर मोहल्ला, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी सुसरबाग, वरुणतिर्थ राजारामपुरी, मातंगवसाहत या भागात मताधिक्य मिळाले आहे. तर राजेश क्षीरसागर यांना शुक्रवारपेठ, शाहू उद्यान, बाबुजमाल, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, सिध्दार्थनगर, भवानी मंडप आदी भागात चांगली मते मिळाली. गेल्या दोन निवडणुकीत क्षीरसागर यांना बावडा, शिवाजी पेठ या भागात मोठे मताधिक्य मिळाले होते, याच भागात जाधव यांनी सुरुंग लावून त्यांचे मतदान फोडले. ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, टाकाळा, साईक्स, उद्यमनगर या भागात दोघांनाही पन्नास पन्नास टक्के मते मिळाली.
- क्षीरसागर यांना नाराजी नडली
निवडणुक जाहीर झाल्यापासून ‘क्षीरसागर नकोत’एवढी एकच भावना विविध घटकात निर्माण झाली होती. त्यामुळे हे सर्व घटक पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या पराभवासाठी कामाला लागले होते. भीमा कोरेगांव दंगलीवेळची वादग्रस्त भूमिकाही त्यांना चांगलीच भोवली.