लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यामध्ये विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तर माजी संचालक बाबासाहेब चौगले यांच्यासह अठरा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसचे विद्याधर गुरबे व राष्ट्रवादीचे महाबळेश्वर चौगुलेंना उमेदवारीची लॉटरी लागली.
विरोधी आघाडीकडे नेत्यांबरोबरच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पॅनलची बांधणी करताना नेत्यांना कसरत करावी लागली. निवडणूक जाहीर झाल्या दिवशीच विश्वास पाटील, अरुण डाेंगळे, शशिकांत पाटील, बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, रणजीतसिंह पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सुश्मिता पाटील ही नावे निश्चित होती. नऊ जागांबाबतची उत्सुकता होती, मात्र त्यानंतर हळूहळू अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे, किसन चौगले, एस. आर. पाटील, बयाजी शेळके, प्रकाश पाटील यांची नावांवर शिक्कामोर्तब झाले. गेली दोन दिवस गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील जागांचा पेच निर्माण झाला होता.
गडहिंग्लजमधून मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे नाव निश्चित होते. मात्र, गडहिंग्लज विभागाच्या राजकारणामुळे आमदार राजेश पाटील यांनी महाबळेश्वर चौगुले व अभिषेक शिंपी यांच्यासाठी आग्रह धरला. चौगुले यांचे नाव लावून धरल्याने सोमवारी रात्रीपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटला नव्हता. अखेर सतीश पाटील यांना थांबवून चौगुले यांना संधी दिली. विद्याधर गुरबे व अंजना रेडेकर यांच्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील शेवटपर्यंत आग्रही राहिले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जयंत आसगावकर, विनय कोरे, राजू आवळे, निवेदिता माने, संध्यादेवी कुपेकर, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, मारुतीराव जाधव, बाबूराव देसाई, गोपाळराव पाटील आदी उपस्थित होते.
आत्या व भाचा एकाच पॅनलमध्ये
शाहू शेतकरी आघाडीमध्ये महिला गटातून दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या कन्या व खासदार संजय मंडलिक यांच्या भगिनी सुस्मिता राजेश पाटील आहेत. तर सर्वसाधारण गटातून खासदार मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र असून एकाच पॅनलमध्ये आत्या-भाचा यांना संधी मिळाली आहे.
शेट्टी, उल्हास पाटील, संपतराव पवार अनुपस्थित
‘गोकुळ’मध्ये राज्यात आकारास आलेल्या महाविकास आघाडीचे विरोधी पॅनल बांधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उमेदवारीवरून धूसफूस शेवटपर्यंत राहिली, त्यातूनच माजी खासदार राजू शेट्टी, उल्हास पाटील, संपतराव पवार अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती.
गगनबावडा, हातकणंगले संधी
गगनबावडा व हातकणंगले तालुक्यात ठरावांची संख्या कमी असल्याने येथे अपवाद वगळता कायम डावलले जात होते. मात्र, यावेळेला सत्तारूढ गटाकडून शौमिका महाडिक तर विरोधी आघाडीतून बयाजी शेळके यांच्या रूपाने संधी मिळाली आहे.
गडहिंग्लजला दोन तर चंदगडला एकच
करवीरमध्ये पाच तर राधानगरी तालुक्यात तीन जागा दिल्या आहेत. दोन तालुक्यात अकराशे मते आहेत. त्यापाठोपाठ कागल, भुदरगड, पन्हाळा, गडहिंग्लज तालुक्याला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. चंदगडमध्ये दुसरी जागा देण्यासाठी आघाडीकडून शेवटपर्यंत प्रयत्न झाला, मात्र गडहिंग्लजमधील राजकारणामुळे एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
पॅनलवर ‘सतेज’ यांचाच वरचष्मा
‘शाहू शेतकरी’ आघाडीच्या पॅनलवर पालकमंत्री सतेज पाटील यांचाच वरचष्मा दिसतो. त्यांना मानणाऱ्या सात जणांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी सहा व जनसुराज्य पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.
‘सतेज’ यांच्याकडून समान्य कार्यकर्त्यांना संधी
मंत्री सतेज पाटील यांनी बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, विद्याधर गुरबे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर यांना संधी दिली.
चुयेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून घोषणा
‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पॅनलमधील नावांची घोषणा करण्यात आली.