कोल्हापूर : ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा’ अशा प्रेमाच्या आणाभाका घेणारे संदेश देत तरुणाईने रविवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. राजारामपुरीतील युवा ऑर्गनायझेशनसह अन्य संस्थांनी या प्रेमदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड दिली.
तरुणाईमध्ये रविवारी उत्साहाचे वातावरण होते. शहरातील विविध बगीचे, कॉफी शॉप, आइस्क्रीम पार्लर, कोल्ड्रिंक हाऊस, आदी ठिकाणी तरुणाईने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. युवक, युवतींनी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्प देऊन आपले प्रेम व्यक्त केले. काहींनी शुभेच्छापत्रे, टेडीबेअर, सरप्राईज बॉक्स, मेसेज बॉटल, लव्ह मॅटर फ्रेम, काचेचे पाॅट, केक, चॉकलेट, कपल वॉच, किचेन्स, आदी स्वरूपांतील भेटवस्तू देत आनंद व्यक्त केला.
तरुणाईमध्ये भेटवस्तू देण्यावर भर होता. प्रेमविवाहामधील दाम्पत्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील राजारामपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शाहूपुरी, आदी ठिकाणच्या कॉफी शॉप्स, केक शॉपी, हॉटेल्समध्ये विशेष सजावट केली होती. तेथे तरुणाईची रविवारची सायंकाळ प्रेममयी झाली. अनेक युवक-युवतींनी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा बेत आखला होता. दरम्यान, युवा ऑर्गनायझेशनने राजारामपुरी पहिली गल्ली उद्यानामध्ये सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याची संकल्पना ‘प्रेम करायचे, तर रक्तदान करूनच’ अशी होती. यावेळी युवा ऑर्गनायझेशनचे सोनल शिर्के, मंदार तपकिरे, सत्यजित जाधव, विक्रम आंबले, धनंजय पोवार, अनिकेत कोरगावकर, सत्यजित जाधव, अभिजित पसारे, सुमंत खराडे, प्रतीक गवस, रोहित देसाई, आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा १६वे वर्ष असून तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचशेहून अधिकजण रक्तदान केले. यासह नो नेम युथ ऑर्गनायझेशनतर्फे कोल्हापूर ते पन्हाळा दुचाकी रॅली काढण्यात आली. यात वाहतुकीचे नियम पाळून पन्हाळा येथील आश्रमशाळेला आर्थिक मदत दिली.
सोशल मीडियावर प्रेमवर्षाव
रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण दिवसभर व्हॉट्सअॅप, फेसबुक, आदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. काहीजणांनी आपल्या प्रियजनांची छायाचित्रे डीपीसह स्टेटसवर ठेवली होती. प्रेमगीते, प्रेमसंदेशांची देवाणघेवाण, इमेजीस, प्रतीकात्मक छायाचित्रे, आदींचा अक्षरश: वर्षाव होत होता.